Lonavala : आई माऊलीचा उदो उदोच्या गजराने दुमदुमला कार्ल्याचा डोंगर

पालखी मिरवणूक सोहळा पाहण्याकरिता भाविकांची मांदीयाळी 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरेचा पालखी मिरवणूक सोहळा वेहेरगाव गावातील कार्ला डोंगरावर आज चैत्र शुद्ध सप्तमीच्या सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला. आई माऊलीचा उदो…उदो…एकविरा माते की जय… या भाविकांच्या घोषणांनी वेहेरगाव गावाचा डोंगर व परिसर दुमदुमला होता. पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे पालखी सोहळा अतिशय शांततेमध्ये पार पडला. आकर्षक रोषणाईमुळे गडाचा परिसर उजाळून निघाला होता. 

गुढीपाडवा ते रामनवमी या चैत्र नवरात्रोत्सवात वेहेरगावच्या गडावर कुलस्वामींनी एकविरा देवीची यात्रा भरते. तमाम कोळी, आग्री, कुणबी, सोनार अशा विविध समाजांचे एकविरा देवी हे आराध्य दैवत असल्याने या यात्रेला कोकण परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. कोकण परिसरातून मागील दोन दिवसांपासून देवीच्या पायी पालख्या गडाकडे येऊ लागल्या होत्या. सकाळपासून गडावर भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. दुपारी साडेबारा वाजता गर्भगाभार्‍यात देवीची आरती करत देवीचा मुखवटा मानाच्या पालखीत ठेवण्यात आला. तद्नंतर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, उपाध्यक्ष मदन भोई, खजिनदार नवनाथ देशमुख, सह खजिनदार विलास कुटे यांच्यासह चौल व आग्राव या पालखीच्या मानकर्‍यांच्या हस्ते पालखीची गडावर मिरवणूक काढण्यात आली. यात्रेमधील चैत्र शुद्ध षष्ठी, सप्तमी व अष्टमी हे मानाचे दिवस आहेत. यात्रा काळात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. गडावर येणार्‍या भाविकांना सहज व सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी तयारी करण्यात आली होती. 

लोणावळा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्यासह लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले व आठ पोलीस निरीक्षक, 15 पोलीस उपनिरीक्षक, 160 पुरुष व 40 महिला पोलीस कर्मचारी, 15 वाहतूक शाखेचे कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या प्रत्येकी 25 जणांच्या तीन टीम, असा मोठा पोलीस बंदोबस्त लोणावळा ग्रामीण व पुणे ग्रामीण पोलिसांनी गड परिसरात तसेच कार्ला फाटा ते गड पायथा दरम्यान तैनात ठेवला होता. अपर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी गडावर भेट देत बंदोबस्ताची पाहणी केली. प्रशासनाच्या वतीने गड परिसरात वाद्य तसेच फटाके वाजण्यास बंदी घालण्यात आली होती. 

यावर्षी प्रथमच गड सकाळपासून भाविकांनी गजबजला होता. कोकण भागातून पायी पालखी घेऊन आलेल्या भाविकांकरिता दर्शनाची वेगळी रांग करण्यात आली होती. पुढील वर्षीपासून महिलांकरिता स्वतंत्र दर्शन रांग करण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस असल्याचे अध्यक्ष अनंत तरे यांनी सांगितले. 

सायंकाळी देवीच्या मानाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी व मिरवणुकीचा सोहळा "याची देही याची डोळा" पाहण्यासाठी भाविकांनी गडावर प्रचंड गर्दी केली होती. पारंपारिक वाद्यांच्या गजरात देवीच्या मिरवणुकीचा सोहळा रंगला होता. मानाच्या पालखीसह गडावर आलेल्या इतर पालख्यांची देखील यावेळी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. देवीचा नवस फेडण्याकरिता व लहान मुलांचे जावळ काढण्याकरिता दिवसभर भाविकांची ये जा गडावर पाहायला मिळत होती. स्थानिक व्यावसायिकांची दुकाने यात्रेकरिता हारफुल, प्रसाद व खेळणी आदी साहित्यांनी भरली होती. 

रितीरिवाजाप्रमाणे पूजाअर्चा 

एकविरा देवीच्या मंदिरात भल्या पहाटे रितीरिवाजाप्रमाणे देवीचा दुग्धाभिषेक करत पूजाअर्चा व पहाटेची आरती करत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी व सायंकाळी ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे व विश्वस्त यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यात्रेच्या मुख्य तिनही दिवस 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. तसेच गडावर चढताना भाविकांना देवीचे दर्शन व्हावे याकरिता क्लोज सर्किट टीव्ही व मोठ्या स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. 

आरोग्य विभागाच्या वतीने दोन कक्ष 

देवीच्या दर्शनाकरिता येणार्‍या भाविकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याकरिता मावळ तालुका आरोग्य विभाग व कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गड व पायथा अशा दोन ठिकाणी केंद्र उभारण्यात आली होती. कार्ला आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. चव्हाण यांच्यासह 35 कर्मचारी, आरोग्य विभागाच्या तीन रुग्णवाहिका व 108 क्रमांकाच्या तीन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.