Pune news : कार्तिकी एकादशीनिमित्त ‘विठू माऊली माझी’ कार्यक्रमात राहुल देशपांडे यांच्या गायनाने भक्तांनी अनुभवली पंढरीची वारी

एमपीसी न्यूज : आषाढी-कार्तिकी वारी म्हटली कीभक्तांची पावले वळतात ती विठुरायाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरीकडे.. पण आज भल्या पहाटे विठ्ठलाचा गजर झाला तो (Pune news) पुण्यातील वानवडी परिसरातील असंख्य रसिकांच्या मांदियाळीत… निमित्त होते शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या विठु माऊली माझी‘ या भजन पहाट कार्यक्रमाचे..!

रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कार्तिकी एकादशी निमित्त आज (दि. 4 नोव्हेंबर) महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात भजन पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नप्रभा जगताप, प्रशांत जगताप, राजेश फुलपगार, प्रफुल्ल जांभुळकर, शमिका जांभुळकर आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. महेंद्र पठारे, नंदाताई लोणकर, जितोचे अध्यक्ष राजेंद्र सांकला, जितो महिला विभागाच्या अध्यक्षा लकिशा मर्लेचा, डीसीपी नम्रता पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

राहुल देशपांडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर करीत केली. त्यानंतर ‘लक्ष्मीवल्लभा दीनानाथा पद्मनाभा’ ही रचना सादर केली. ग. दि. माडगुळकर यांचे शब्द आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ‘जथा वैष्णवांचा पंढरीस जातो’ ही रचना ऐकताना रसिकांनाही आपण जणूकाही पंढरीच्या वाटेवरच आहोत, अशी अनुभूती आली. संगीत सौभद्रमधील ‘राधाधर मधुमिलिंद जयजय’, ‘आधी बीज एकले’ या रचनांनंतर रसिकांच्या आग्रहाखातर राहुल देशपांडे यांनी ‘सूर निरागस हो’ हे शब्द उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Pimpri Corona Update: शहरात आज 23 नवीन रुग्णांची नोंद; 32 जणांना डिस्चार्ज

निर्गुणी भजन, ‘टाळ बोले चिपळीला’, ‘कैवल्य गान’, ‘कानडा राजा पंढरीचा’ या रचना रसिकांना रोमांचित करणाऱ्या ठरल्या. (Pune news) अखेरीस राहुल देशपांडे यांच्या सुरात सूर मिसळत विठ्ठलाचा गजर करीत रसिकही पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), प्रशांत पांडव, प्रसाद जोशी (तबला), ऋषिकेश पाटील, निमिष उत्पात (सहगायन) यांनी समर्पक साथ करीत कार्यक्रमाची रंगत वाढविली. कार्यक्रमास लाभलेला प्रतिसाद पाहून राहुल देशपांडे यांनीही रसिकांचे आभार मानले.

कार्तिकी एकादशीनिमित्त दरवर्षी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कुणाच्याही मदतीविना (Pune news) कार्यक्रमाचे मोफत आयोजन केले जात असून संस्थेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून कार्यक्रमाचे 23वे वर्ष असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रास्ताविकात सांगितले. वानवडीत होत असलेला कार्यक्रम नागरिकांसाठी पर्वणी असल्याचे प्रशांत जगताप म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.