Chinchwad : केजुबाई बंधा-यात मासे आढळले मृतावस्थेत

एमपीसी न्यूज – पवना नदीवर असलेल्या केजुबाई बंधा-यात काही मासे मृतावस्थेत आढळले आहेत. नाल्यातून रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे  मासे मेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या केजुबाई बंधारा येथे  सांडपाण्याचे नाले पाणी दूषित करत आहेत. थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या पदाधिका-यांना वाईल्ड फोर नेचरचे शुभम पांडे फोनकरुन केजुबाई बंधा-यातील मासे अंतिम श्वास घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर फाऊंडेशनचे पदाधिकारी शुक्रवारी रात्री केजुबाई बंधा-यावर पोहचले. त्यांना मासे मृतावस्थेत आढळून आली. या पदाधिका-यांनी महापालिका अधिका-यांना याची माहिती दिली. महापालिकेच्या अधिका-यांनी नदीपात्रातील पाणी आणि मृत मासे प्रयोगशाळेत नेले आहेत.

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी आज (शनिवारी) सकाळी केजुबाई बंधा-याची पाहणी केली. ताथवडेगावापर्यंत जे नाले थेट नदीत सोडले आहेत. त्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तपासणी करुन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन महापालिका अधिका-यांनी दिल्याचे, थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी सांगितले. कारवाई न झाल्यास आंदोलनाची तयारी करावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

महापालिका प्रशासनच पर्यावरणाचा -हास करत असल्याचा आरोप करत थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे की, थेरगाव येथील केजुबाई बंधारा येथे पवना नदीची अवस्था खूप दयनीय झाली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामूळे आज लाखोच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले आहेत. काही छोटे व्यावसायिक केमिकल्स पवना नदीत सोडत आहेत का याचा शोध महापालिका का घेत नाही?, महापालिकेने त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. महापालिका जलपर्णी काढणा-या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे का?  जलपर्णी मशीनच्या सह्याने न काढता मनुष्यबळाचा वापर का केला जात आहे?, नदीमध्ये विनाप्रक्रिया थेट पद्धतीने मैलामिश्रित सांडपाणी महापालिकेमार्फत सोडले जात असल्याचा आरोप करत हीच महापालिकेची नदीसुधार योजना आहे का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत बोलताना महापालिकेचे पर्यावरण कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, ” नदीपात्रात रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे त्याच्या धक्याने मासे मेले असण्याची शक्यता आहे. छोटे मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. पाण्याचे नमुने घेतले असून प्रयोगशाळेत तपासणीला दिले आहेत. प्रदुषण नियंत्रण मंडळाला देखील याची कल्पना दिली असून पाण्यात केमिकल आले आहे का? हे तपासण्यास सांगितले आहे. याबाबतचा ‘रिपोर्ट’ सोमवारी येईल” असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.