Pune News : इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून कोसळल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळलेल्या एका कामगार मजूराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ सिवन्ना आलुरे (वय 35) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ठेकेदार राजाराम कंधारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस अंमलदार राजेश गोसावी यांनी तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळवाडी रस्त्यावर नेचर व्ह्यू बिल्डींग या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या कामाचा ठेका कंधारे याने घेतला असून, तो कामगारांकडून काम करून घेत होता. दरम्यान, कामगार सोमनाथ हा या इमारतीत राहत होता. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सोमनाथ याचा पाचव्या मजल्यावरून तोल गेल्याने तो डक्टमध्ये पडून गंभीर जखमी झाला. यात गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

ठेकेदार कंधारेने कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेता तसेच इमारतीवरून एखादी व्यक्ती खाली पडून त्याचा मृत्यू होऊ शकतो असे माहीत असतानाही देखील निष्काळजीपणे बांधकाम सुरू केले. त्यामुळे ही घटना घडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.