Vadgaon Maval : खादीग्रामोद्योग संघ विचारतंय, ‘कुणी जागा देता का जागा’

मावळ पंचायत समितीच्या गलथानपणामुळे खादीग्रामोद्योग संघाची जागेसाठी वणवण

एमपीसी न्यूज- मावळ पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे खादीग्रामोद्योग संघाला जागेसाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात संघाला जागा न दिल्यास पंचायत समितीच्या आवारात सर्व संचालक व लाभार्थीं बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मावळ पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत मावळ खादीग्रामोद्योग संघाचे कार्यालय होते. पंचायत समितीची नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी संघाचे कार्यालय त्या जागेत येत असल्यामुळे नवीन इमारत बांधताना अडचण होत होती. म्हणून संघाचे कार्यालय पाडण्यात आले. मात्र तत्कालीन पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांनी नवीन इमारतीत संघाला जागा देण्याचे आश्वासन दिले होते. तसा लेखी ठरावही करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, संचालक सुदेश गिरमे,चंद्रकांत दहिभाते, चंद्रजीत वाघमारे यानी दिली.

परंतु, नवीन इमारत तयार होऊन पंचायत समितीचे कामकाज सुरू झाल्यानंतरही खादी ग्रामोद्योग संघाला वेगवेगळी कारणे सांगून जागा देण्यास अधिकारी व पदाधिकारी हे टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संघाला बसायला जागा नाही.

या संस्थेच्या मार्फत ग्रामीण भागातील बेरोजगारांना व मागासवर्गीयांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. या संस्थेचे 3 हजार 267 सभासद असून पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत 1 कोटीच्यावर कर्जवाटप केले आहे. परंतू सध्या या कार्यालयाला जागा नसल्याने त्याचा फटका लाभार्थींना बसू लागला आहे.

येत्या आठ दिवसात संघाला जागा न दिल्यास पंचायत समितीच्या आवारात सर्व संचालक व लाभार्थीं बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती आंबेकर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.