Kivale Accident Update : वातावरणात बदल झाल्याने लवकर सुटले, पण मृत्यूने वेढले; ‘या’ मजुरांचा दुर्दैवी अंत!

एमपीसी न्यूज : सध्या पुण्यात ऊन-वारा आणि पावसाचा खेळ (Kivale Accident Update ) सुरू आहे. परंतु, याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. याच वाऱ्या आणि पावसापासून बचाव करण्यासाठी घेतलेला आधार आज पाच जणांना महागात पडला. सोसाट्याचा वारा सुटला म्हणून किवळे येथे काहींनी होर्डिंगचा आधार घेतला. परंतु, तोच अंगावर पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.

या घटनेचा पहिला कॉल थेरगाव अग्निशमन उपकेंद्राला पावणे पाच वाजता आला. थेरगाव अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून तात्काळ मुख्य अग्निशमन केंद्रास माहिती दिली. त्यानुसार पिंपरी, रहाटणी, प्राधिकरण येथून एकूण 30 जवान मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

जेसीबीच्या सहाय्याने काही काही प्रमाणात बाजूला करून त्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने यामध्ये चार महिला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेतील मृत्यू झालेल्या व्यक्ती आणि जखमी जवळच असलेल्या एका बांधकाम साइटवर काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्याने या कामगारांना लवकर सोडण्यात आले होते. घरी जात असताना अचानक सोसायट्याचा वारा आल्याने हे कामगार एका पंक्चरच्या दुकानामध्ये आडोशाला थांबले. त्याचवेळी मोठा होर्डिंग कोसळून ही दुर्दैवी घटना घडली.

होर्डिंगचा संपूर्ण सांगाडा मंगळवारी सकाळी उचलण्यात येणार आहे. त्यासाठी क्रेन आणि जेसीबी मागविण्यात येणार आहेत. मृतांची आणि जखमींची ओळख पटली असून त्यांचे नावे पुढील प्रमाणे –

मृतांची नावे –

अनिता उमेश रॉय (वय 45, देहूरोड)
शोभा विनय टाक (वय 50, पारशी चाळ, देहूरोड)
वर्षा केदारे (वय 40, शितळानगर, देहूरोड)
भारती मंचळ (वय 30, शितळानगर, देहूरोड)
राम प्रल्हाद आत्मज (वय 20, उत्तर प्रदेश)

जखमींची नावे – 

विशाल शिवशंकर यादव (वय 20, उत्तर प्रदेश)
रहमद मोहमद अंसारी (वय 21, बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे)
रिंकी दिलीप रॉय (वय 45, देहूरोड)

 

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडचे पोलीस (Kivale Accident Update) आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ तसेच इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.