MI Vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर मिळवला 52 धावांनी मोठा विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : मुंबई आणि कोलकाता (MI Vs KKR) या दोन संघातल्या आत्मसन्मानासाठीच्या लढाईतही मुंबई इंडियन्सच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडली. आणि 52 धावांच्या लाजिरवाण्या पराभवाने  मुंबई आज जखमेवर जणू मीठच चोळले.

अंकतालिकेतल्या अखेरच्या दोन संघातल्या आजच्या टाटा आयपीएल 2022 मधल्या 56 व्या सामन्याला आज मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर सुरुवात झाली,ज्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहीतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आज सामना (MI Vs KKR) सुरु होण्याआधीच मोठा झटका बसला.

फॉर्मात असलेला आणि मधल्या फळीतला खंदा फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला. त्याच्या जागी मुंबई इंडियन्सने रमणदीपसिंगचा समावेश केला तर केकेआरने आजच्या सामन्यासाठी आपल्या संघात तब्बल 5 बदल केले.

केकेआरसाठी अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर यांनी पहिल्या गड्यासाठी दणदणीत सलामी देत आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. अय्यर आज फारच आक्रमक झाला होता. त्याने फक्त 24 चेंडूत 4 षटकार आणि तीन चौकार मारत तुफानी 43 धावा केल्या. अखेर याच आक्रमकतेच्या नादात तो कार्तिकेयनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मात्र त्याने पहिल्या गड्यासाठी रहाणे सोबत फक्त 34 चेंडूत 60 धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याच्या जागी आलेल्या नितीश राणाने रहाणेला साथ देत फक्त 27 धावांची भागीदारी जोडली असतानाच रहाणे 25 धावावर असताना कार्तिकेयनच्याच गोलंदाजीवर (MI Vs KKR) त्रिफळाबाद झाला.

त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरला आज तरी फारसे योगदान देता आले नाही. तो आठ चेंडूत फक्त 6 धावा काढून मुर्गन अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि केकेआरची अवस्था 14 व्या षटकात 3 बाद 123 अशी झाली.मात्र परिस्थिती अशी असली तरीही नितीश राणा मात्र जबरदस्त अंदाजात खेळत होता. मात्र त्याला साथ द्यायला आलेला आंद्रे रसेल आज फक्त 9 धावा करुन बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला.

यावेळी केकेआर संघ बऱ्यापैकी अडचणीत आला होता.त्यातच बुमराहने याच षटकात जम बसलेल्या नितीश राणाची छोटी पण आक्रमक खेळी करुन केकेआरचा अर्धा संघ तंबूत पाठवण्यात मोठा वाटा उचलला. यावेळी केकेआरची धावसंख्या 5 बाद 139 होती. या पडझडीने केकेआरच्या डावाला स्थैर्य काही आले नाही आणि नंतरच्या 31 चेंडूत केकेआरने फक्त 26 धावा जमवल्या आणि आपल्या नावावर 9 बाद 165 अशी बऱ्यापैकी लढण्यायोग्य धावसंख्या जमवण्यात यश मिळवले.

मुंबईकडून बुमराहने आज जबरदस्त गोलंदाजी करत केकेआरचा अर्ध्या संघाला तंबूत पाठवून आपल्याला फॉर्म सापडला आहे याचाच संकेत दिला यातल्या दोन पंधराव्या तर तीन विकेट्स 17 व्या षटकातल्या 4 चेंडूत आल्या,मुंबईचे या आयपीएल मधले आव्हान जवळजवळ संपुष्टात आले असले तरीही बुमराहचे फॉर्म मध्ये भारतीय संघासाठी खूप गरजेचे आहे.

विजयासाठी हव्या असलेल्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला पहिलाच धक्का पहिल्याच षटकात रोहीतच्या बाद होण्याने बसला. रोहीतने 6 चेंडू खर्च करुन फक्त दोन धावा काढल्या. त्याला साऊदीने बाद केले. या मोठया धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत ईशान किशनने तिलक वर्माच्या साथीने प्रतिकार सुरू ठेवला. पण तिलक वर्मा आज तरी काही खास योगदान देऊ शकला नाही. त्याला रसेलने बाद केले.

तिलक वर्माने फक्त 6 धावा केल्या आणि ईशान बरोबर दुसऱ्या गड्यासाठी 30 धावांची भागीदारीही. त्याच्या जागी आला तो सूर्यकुमारच्या जागी संघात स्थान मिळालेला रमणदीपसिंग. मात्र त्याला ना स्वतःला सिद्ध करता आले ना सूर्यकुमार यादवची कमी भरून काढता आली. त्याचा खेळ फक्त 12 धावांवर असताना रसेलनेच खल्लास करत मुंबई इंडियन्सला (MI Vs KKR) तिसरा मोठा धक्का दिला. यावेळी मुंबई इंडियन्सची धावसंख्या होती 10.3 षटकात 3 बाद 69.

यानंतर आलेल्या टीम डेविडने 3 चेंडूत 3 चौकार मारत सुरुवात तर जोरदार केली होती, पण त्याची ही आक्रमकता फारच अल्पजीवी ठरली.त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले आणि त्यानंतर 30 धावा जमवता जमवता मुंबईचे आणखी 4 गडी बाद झाले आणि मुंबई संघ चांगलाच अडचणीत आला,पंधराव्या षटकात पॅट कमीन्सने 3 गडी बाद करुन मुंबईला पूर्णपणे खिंडीत पकडले ज्यातून मुंबईचा संघ सावरू शकला नाहीच.आणि मुंबई संघाला आपले 20 षटकेही पूर्ण करता आले नाहीत. त्यांचा डाव 17.3 षटकातच 113 धावांमध्येच  गारद झाला आणि तब्बल 52 धावांनी मोठा आणि आणखी एक नामुष्कीजनक पराभव मुंबईच्या वाट्याला आला.

मुंबईसाठी ईशान किशनने सर्वाधिक 51 तर पोलार्डने 15 धावा केल्या, बाकीच्या फलंदाजानी फक्त हजेरी लावली,आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या मुंबईसाठी हा पराभव जखमेवर मीठ चोळणारा ठरला तर केकेआरसाठी हा किमान समाधान देणारा विजय ठरला.केकेआर साठी कमिम्सने 3 तर रसेलने दोन बळी मिळवत मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडले ज्यामुळे मुंबई इंडियन्सची पुरती वाताहात उडाली आणि मुंबई संघाला आणखी एक मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

संक्षिप्त धावफलक (MI Vs KKR)

कोलकाता नाईट रायडर्स
9 बाद 165
व्ही अय्यर 43,रहाणे 25,राणा 43,रिंकू सिंग नाबाद 23
बुमराह 10/5,कार्तिकेय 32/2
विजयी विरुद्ध

मुंबई इंडियन्स
17.3 षटकात सर्वबाद 113
ईशान किशन 51,पोलार्ड 15,टीम डेविड 13,रमणदीप सिंग 12
कमिन्स 22/3,रसेल 22/2,साऊदी 10/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.