Kothrud : ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास यांना यावर्षीचा पं जितेंद्र अभिषेकी पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – यंदाचा पं जितेंद्र अभिषेकी पुरस्कार ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास यांना (Kothrud) जाहीर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम गायक व संगीतकार पद्मश्री पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव यावर्षी येत्या 29, ते 31 मार्च दरम्यान कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे.

महोत्सवाचे हे 18 वे वर्ष असून माननीय उज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायं 5.30 ते रात्री 10 अशी एकूण पाच सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यापैकी दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीचे सकाळचे सत्र हे ‘युवोन्मेष’ नावाने संपन्न होणार असून यामध्ये युवा कलाकारांची कला रसिक प्रेक्षकांना अनुभविता येणार आहे.

यावर्षी पं. जितेंद्र अभिषेकी पुरस्कार ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास यांना प्रदान करण्यात येईल. तसेच या वर्षीचा (Kothrud) ‘प्रथितयश गायिका पुरस्कार’ सुप्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांना प्रदान करण्यात येईल असेही अभेद अभिषेकी यांनी सांगितले.याबरोबरच संगीत क्षेत्रातील कार्यक्रमांचे यशस्वीपणे संयोजन करणारे गोविंद बेडेकर यांना ‘यशस्वी संयोजक पुरस्कार’ देत सन्मानित करण्यात येईल. तर मोहनकुमार दरेकर यांचा षष्ट्याब्दीपूर्ती निमित्त सन्मान केला जाईल.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवार दि 29 मार्च) उद्घाटनानंतर अभिषेकी बुवांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या रचनांचे सादरीकरण असलेला ‘स्वराभिषेक’ हा कार्यक्रम संपन्न होईल. यामध्ये पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य डॉ राजा काळे, पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य, सुपुत्र व सुप्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य व प्रसिद्ध गायक आनंद भाटे आदी कलाकार सादरीकरण करतील.

Dehu : देहूतील संत तुकाराम विद्यालयात 37 वर्षांनी भरली शाळा

दुसऱ्या दिवशी (शनिवार दि 30 मार्च) युवोन्मेषच्या पहिल्या सत्रात यश कोल्हापुरे (गायन), नितिश पुरोहित (सरोद वादन) आणि भाग्येश मराठे (गायन) हे कलाकार आपली कला सादर करतील.

त्याच दिवशी (दि.30 मार्च) सायंकाळी 5 वाजता सुरु होणाऱ्या सत्रात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य संगीताचार्य पंडित मोहन दरेकर यांचे गायन होईल. यानंतर सारंगीवादक पं राम नारायण यांचे नातू आणि शिष्य हर्ष नारायण यांचे सारंगी वादन होईल. या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची (दि.31 मार्च) आणि युवोन्मेषच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात ही दिल्लीचे गायक दीपक सिंग यांच्या गायनाने होईल यानंतर सावनी तळवलकर यांचे एकल तबलावादन होईल, विलिना पात्रा (गायन) यांच्या गायनाने सकाळच्या सत्राचा समारोप होईल.

तिसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्राची सुरूवात श्रीमती मनाली देव यांच्या कथक नृत्य प्रस्तुतीने होईल. त्यानंतर विदुषी संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन होणार असून महोत्सवाची सांगता किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं अजय पोहनकर यांच्या गायनाने होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.