Talegaon : कृष्णराव भेगडे यांनी पद आणि प्रतिष्ठेचा कधीही गर्व केला नाही – नानासाहेब नवले

मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रम

एमपीसी न्यूज – समाजात ज्ञाती आहेत पण निती नाही. सर्वच क्षेत्रात अहंकार बोकाळला असून देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समविचारी व सदगुणी माणसे एकत्र आली पाहिजेत. कृष्णराव भेगडे यांनी आयुष्यभर समाजोद्धारासाठी सद्गुणी लोकांना एकत्र करत मोठी कामे केली. परंतु पदप्रतिष्ठेचा गर्व कधीही केला नाही, असे मत माजी खासदार तथा संत तुकाराम सहकारी साखर कारख्यान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांनी आज येथे केले.

मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री मदन बाफना, आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, डॉ.अशोक निकम, राजाराम म्हस्के, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, संचालक माऊली दाभाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, मुकुंदराव खळदे, सुरेशभाई शहा, चंद्रकान्त शेटे, शैलेश शाह, विलास काळोखे आणि प्राचार्य डॉ.संभाजी मलघे व्यासपीठावर उपस्थित होते.

कृष्णराव भेगडे यांनी कधीही राग, लोभ, लालसा आणि गर्व केला नाही. त्यामुळे सज्जन मनुष्य म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान प्राप्त केले, असे सांगून नवले पुढे म्हणाले, की भेगडे साहेबांनी नेहमी संत विचारांनी काम केले. शेतक-यांना संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची त्याकाळी भविष्याची चाहूल घेऊन उभारणी करण्यात आली. आज मावळ तालुका केवळ भातशेतीवर उपजीविका करत नसून मोठया प्रमाणावर उस लागवड झाली आहे. त्यामुळे मावळचा चेहरा मोहरा बदलत आहे.

भेगडे साहेबांच्या राजकीय जीवनातील आठवणींना उजाळा देताना माजी मंत्री मदन बाफना म्हणाले, की संघर्षाचे राजकारण सोडून त्यांनी प्रेमाच्या राजकारणाची कास धरली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात देखील मोलाचे आहे. समाजकारणात आणि राजकारणात कसं वागायचं याची शिकवण भेगडे साहेबांच्या रूपाने तरूण पिढीपुढे आहे. आजही त्यांच्या कार्याचा उत्साह तरूणांना लाजवेल असा वाखाणण्याजोगा आहे.

आमदार बाळा भेगडे म्हणाले, की भेगडे साहेबांची कारकिर्द दैदीप्यमान आहे. राजकारणात सर्वांना बरोबरीने घेत काम केल्याने ते आमच्यासाठी दीपस्तंभ आहेत. संघर्षमय वातावरण संपवून त्यांनी मैत्रीमय वातावरण निर्माण केले. त्यामुळे तालुक्यासारखे समविचारांचे राजकारण राज्यात कुठेही दिसत नाही.

यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानीत करण्यात आले. रोटरी क्लब तळेगाव सिटीतर्फे त्यांना व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार नानासाहेब नवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरणही करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना कृष्णराव भेगडे म्हणाले, की माझ्या मनात मोठेपणाचा विषय नाही. लोकांच्या सहकार्यामुळेच मोठी कामे करता आली. देशातील 63 टक्के लोकांच्या घरात चूल पेटण्याची भ्रांत असताना त्यांचे दु:ख निवारण करण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता अशा उपेक्षितांसाठी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे. राजकारणाला विकृत स्वरूप आले असून राजकारण हे शिवी वाटत आहे. राजकारण हे समाजसेवेचे साधन बनले पाहिजे. ही परिस्थिती बदलण्याचे आव्हान युवकांपुढे आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करण्याचे मी शिकलो आहे. नव्यापिढीला चांगले घडविण्याचे काम हे केवळ शिक्षण संस्थाच करू शकतात, म्हणून भेदभेदांच्या पलिकडे जाऊन आम्ही ध्येयवादाने शिक्षण संस्थांतून हे काम करत असतो. येणा-या काळात याचे महत्व लोकांना कळेल. शेती, शिक्षण आणि सहकार या तीन गोष्टींनाच मी अधिक महत्व दिले आहे. आता वयोमानाच्या मर्यादेमुळे आपण विविध संस्थावरील पदांच्या जबाबदारीतून लवकरच मुक्त होणार असून केवळ एक कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

इंद्रायणी महाविद्यालय विकास समितीवर नव्याने नियुक्ती झालेल्या विलास काळोखे, चंद्रभान खळदे, संदीप काकडे, सुनील काशिद, संजय साने, संजय वाडेकर आदी सदस्यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश शहा यांनी केले. सूत्रसंचालन विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष संदीप काकडे आणि प्रा. संदीप भोसले यांनी केले. आभार डॉ. दीपक शहा यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.