Lata Didi gives special wishes to PM Modi: गानकोकिळेने दिल्या पंतप्रधानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज – गानकोकिळा लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. लतादीदी व्टीटरवर नेहमीच सक्रीय असतात. त्यांनी रक्षाबंधनानिमित्त खास व्हिडिओ संदेश पाठवला आहे. त्यात त्यांचे व पंतप्रधान मोदी यांचे फोटो आहेत. यंदाच्या या करोना काळात स्वत: राखी पाठवता आली नाही याचे दु:ख असल्याची भावना लतादीदींनी स्वत:च्या आवाजात या संदेशात व्यक्त केली आहे.

‘नरेंद्रभाई, रक्षाबंधनाच्या या पवित्र प्रसंगी आपल्याला माझा प्रणाम. मी यावेळी राखी पाठवू शकले नाही…का ते सारे जग जाणते. तुम्ही या देशासाठी घेतलेले प्रचंड परिश्रम कोणीही विसरु शकणार नाहीत. आज या देशातील लक्षावधी भगिनींच्या हातात तुम्हाला बांधण्यासाठी राखी आहे, जरी ती बांधणे त्यांच्यासाठी कठीण असले तरीसुद्धा…हे तुम्हीसुद्धा जाणता. रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी आपल्या देशाला परम उंचीवर नेण्याची भेट या भगिनींना तुम्ही द्यावी अशी आशा. नमस्कार’, असे लतादीदींनी स्वत:च्या आवाजात पंतप्रधानांना सांगितले आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवर असून ‘नमस्कार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई. आपके लिए मेरी ये राखी’ असा लिखित संदेश देखील त्यात आहे. लतादीदी ट्विटरवर नेहमीच पोस्ट करत असतात. दिवंगत गायक महंमद रफी यांच्या ३१ जुलै रोजी असलेल्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली व ३० जुलै रोजी गायक सोनू निगम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील त्यांनी पाठवल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.