Chinchwad News: समाजमाध्यमाचा अवाजवी वापर अन् ट्रोलिंग प्रचंड खटकते – चिन्मय मांडलेकर

एमपीसी न्यूज –  समाजमाध्यमे आल्यानंतर सगळेच आनंदी होतो. पण, सध्या समाजमाध्यमांचा अवाजवी वापर आणि त्यावर होणारे ट्रोलिंग खटकणारी गोष्ट आहे. त्याबद्दल मला प्रचंड राग आहे. समाजमाध्यमांवर जग जितके भीषण वाटते, तितके नाही. ख-या आयुष्यात खूप चांगली माणसे आहेत, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, पटकथाकार, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (शनिवारी)  मांडले.

कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने यावर्षीचा कलागौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना माजी मंत्री, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर प्रसिध्द अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी “प्रवास चिन्मय मांडलेकरांचा” ही प्रकट मुलाखत घेतली. त्यांच्या नाटक, चित्रपट क्षेत्रातील वाटचालीचे पैलू यावेळी उलगडले.

 

या पुरस्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यावह डॉ. प्रवीण दाबडघाव, पुणे विभाग कार्यावह श्री. मुकुंद कुलकर्णी, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, भाजपा प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, कलारंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.

लहानपणी गिरगावातल्या वातावरणानं इतिहासाबद्दल प्रचंड प्रेम दिलं. डोळे आणि कान उघडे ठेवायला शिकवलं, असे सांगताना चिन्मय मांडलेकर पुढे म्हणाले, काही कळत नव्हतं. पण, जे मिळेत ते बघायचं. आजी सिलेंडरवर बसून रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगायची. बँकेत कामाला असलेल्या वडिलांचे इतिहासावर, कादंब-यांवर, पु. ल. देशापांडे यांच्यावर त्यांच प्रेम होते. त्या संस्कारामुळे घडलो. मी कॉन्व्हेन्ट शाळेत शिकलो. पण, मराठीवर प्रेम कमी झाले नाही.  मराठीच्या शिक्षिका देवकुळे मॅडम यांनी पहिल्यांदा लिखाणाच्या कलेबाबत अवगत केले होतं. घरात सगळेच शिक्षक असल्यामुळे इतिसाचा प्राध्यापक होऊ, असंच वाटायचं. दहावीला 80 टक्के मिळाल्यानंतर म. र. डहाणूकर महाविद्यालयात प्रवेश झाला आणि तिथेच पहिल्यांदा रंगमंचावर पाय ठेवला. नाटक करियर म्हणून निवडण्यावरून घरात झालेला राडा आणि नंतर अंधेरीपासून माहीमपर्यंत चालत जाण्याचा किस्सा सागतांना त्या संघर्षात वेगळा आनंद होता, असे मांडलेकर म्हणाले.

मांडलेकर पुढे म्हणाले की, महाविद्यालयात असताना एका नाट्य शिबिरात निर्मल पांडेंकडून राष्ट्रीय नाट्य विद्यालयाबाबत समजले.  तिथे प्रवेश मिळाला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात तीन वर्षे नाट्य व अभिनय 24 तास शिकवला जातो. तिथे‌ संपूर्णपणे फक्त तेच करायला मिळतं. या प्रशिक्षणाबरोबर खूप चांगल्या लोकांसमोर काम केलं. त्या सगळ्याचा अवघड रोल व पात्र साकारताना फायदा होतो. क्रांतीवर राजगुरु, वंसतराव नाईक, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय करण्याची किंवा काश्मीर फाईल्समध्ये बिट्टा करण्याची संधी मिळाली. या व्यक्ती माणूस म्हणून काय विचार करत असतील, हे बघतो.

 

नाटकापेक्षा मालिकांमध्ये तयारीला कमी वेळ मिळतो. लग्न आणि अंत्यसंस्कार यासारखी कॉमेडी दुसरीकडे कुठं घडत नाही. लग्नसमारंभ, रेल्वे, बसने केलेला प्रवास अशा गोष्टी एखाद्या लेखकासाठी पर्वणी असतात. मनुष्यस्वभाव विनोदी आहे. अनेक पात्र घरात, आजुबाजुलाच सापडत असतात. कर्मकाडांवरील विश्वास तुकोबांनी संपवला. पण,  देव प्रचंड मानतो. कर्मकांडावर अजिबात विश्वास नाही. मात्र, देवावर प्रचंड विश्वास आहे. राज ठाकरे आवर्जून ऐकतो. ते छान वक्ते आहेत. यापूर्वी विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, शशी थरूर यांची काही भाषणे आवर्जून ऐकल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रात करियर घडवताना पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागेल. म्हणून, प्रत्येक वेळी पुन्हा नव्याने काम करावं लागतं, असंही ते आवर्जून म्हणाले.

आशिष शेलार म्हणाले, “आशुतोष गोवारीकर, लतादीदीनंतर मराठी माणसाचं स्थान चिन्मन मांडेलकर यांनी निर्माण केले. त्यांनी कलाकारी देशाला दाखवली. छत्रपतींवर आठ चित्रपट करण्याचा सुखद धक्का त्यांनी मला दिलाय. शिवरायाचं चरित्र प्रेरणादायी आहे. चिन्मय ही पुढची पिढी असून त्यांच्यावर अपेक्षाचं ओझं आहे. पूर्वीच्या पेक्षा आताचा काळ अवघड आहे. संवेदनशील मनाच्या व्यक्तीने राजकारणात, समाजकारणात असलं पाहिजे. संवेदनशीलता कमी होते. तेव्हाच भोंग्याच्या आवाजावरून स्पर्धा सुरु होतात. कलारंगला 24 वर्षे झाली म्हटल्यावर मी अमितचं वय काय, याचा विचार करायला लागलो. अतिशय कमी वयात आमची उद्योगनगरी सांस्कृतीकनगरी व्हावी, अशा पध्दतीचं स्वप्न पाहून त्यांनी काम सुरू केलं. तर कमी कार्यकीर्दीत मोठं काम अमित गोरखे यांनी कलारंगच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. ते करताना आपली विचार देखील जोपासत आहेत”.

प्रास्ताविकात कलारंगचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले, “कलारंग संस्थेच्या माध्यमातून पिंपरी – चिंचवडमधील सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या २4 वर्षांपासून कार्यरत आहे. मराठी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी कलागौरव पुरस्कार दिला जातो. कोरोनापूर्वी प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांना हा पुरस्कार व त्यांची मुलाखत झाली होती. त्यानंतर हा सोहळा होत आहे. शहराला सांस्कृतीकनगरीची ओळख देण्यासाठी ख्यातनाम मराठी कलाकार शहरात यावेत. शहरातील कलाकारांसमोर त्यांचा जिवनप्रवास उलगडावा. हा हेतू ठेवून हा प्रवास सुरू झाला होता. आत्तापर्यंत 150 पेक्षा जास्त कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. शहरातील कलाकारांच्या कला-गुणांना वाव देणे व त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न कलारंग संस्थेचा असतो”.

या प्रसंगी पिंपरी – चिंचवडमधील कलाकारांना कलारंग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये आकाश थिटे ( लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, वॉईस ओवर आर्टिस्ट), रश्मी घाटपांडे (थिएटर आर्टिस्ट), तेजस चव्हाण (संगीतकार, संगीत संयोजक), निषाद सोनकांबळे (गायक), प्रगल्भ कोळेकर (अभिनेत्री), रविंद्र कांबळे (गायक) यांचा समावेश होता. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.