Loksabha Election 2024 : मुक्त आणि पारदर्शक निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज ; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती (Loksabha Election 2024)आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी  प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एकूण 8 हजार 213 मतदान केंद्र आणि 169 सहाय्यकारी मतदान केंद्र अशा एकूण 8 हजार 382 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी  कविता द्विवेदी, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी अजय मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात पारदर्शक लोकसभा निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. यासाठी स्थीर पथक, भरारी पथक व व्हिडीओ चित्रीकरण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजील’  ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता विषयक तक्रारींचा जलदगतीने निपटारा होणार आहे. आचार संहिता जाहीर झाल्यापासून 48 तासाच्या आत सर्व राजकीय प्रचार साहित्य, पोस्टर, बॅनर्स काढण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांना निर्देश दिले आहेत. निवडणुका निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस विभागामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई, शस्त्रे जमा करणे आदी कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
दिव्यांग व वयोवृद्धांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा
जिल्ह्यात एकूण 82 लाख 24 हजार 423 मतदार आहेत. दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा मतदारांना रांगेत उभे न करता त्यांना मतदानासाठी सहकार्य करण्यात येईल. मतदान केंद्रावर येणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल.
निवडणुकीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था
जिल्ह्यात 20 संवेदनशील मतदान केंद्र असून याठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे. 3 हजार 941 मतदान केंद्रावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने वेबकास्टींग करण्यात येणार असून नियंत्रण कक्षाद्वारे येथील मतदान प्रक्रियेचे अवलोकन करण्यात येईल. केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाचे कर्मचारी आवश्यकतेनुसार तैनात करण्यात येतील. भोर तालुक्यात 32, खेड-आळंदी 5 आणि आंबेगाव तालुक्यात 2 असे एकूण 39 ठिकाणी इंटरनेट व अन्य सुविधा नसलेले मतदान केंद्रे आहेत. त्याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्रावर 24×7 एकात्मिक नियंत्रण कक्ष, संवेदनशील बुथमध्ये वेबकास्टींग, पुरेसा सशस्त्र पोलीस बंदोबस्त, प्रतिबंधात्मक कार्यवाही, संपूर्ण जिल्ह्यात चेक पोस्टचे जाळे आणि सूक्ष्म निरीक्षक तैनात करणे आदी उपाय योजण्यात येणार आहेत.
बारामती मतदारसंघात 7 मे तर इतर तीन मतदारसंघात 13 मे रोजी मतदान
35- बारामती लोकसभा मतदार संघात 12 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्रे दाखल करून घेण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 19 एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 20 एप्रिल रोजी, उमेदवारी मागे घेण्याचा शेवटची  तारीख 22 एप्रिल, मतदानाची तारीख 7 मे रोजी, मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
33- मावळ, 34- पुणे व 36- शिरूर लोकसभा मतदार संघात 18 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे दाखल करून घेण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 25 एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 26 एप्रिल रोजी, उमेदवारी मागे घेण्याचा शेवटची तारीख 29 एप्रिल, मतदानाची तारीख 13 मे रोजी, मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणार
जिल्ह्यात प्रत्येकी 21 आदर्श मतदान केंद्र, महिला संचलित, दिव्यांग संचलित, युवकांद्वारे संचलित आणि विशेष मतदान केंद्र असतील. याद्वारे मतदान केंद्रावर चांगले वातावरण निर्माण करून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृह, व्हीलचेअर, मतदार सुविधा केंद्र, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि उन्हापासून संरक्षणासाठी मंडप किंवा छत असणार आहे.
मतदानासाठी 20 हजार 117 बॅलेट युनिट, 10 हजार 59 कन्ट्रोल युनिट आणि 10 हजार 897 कन्ट्रोल युनिट पुरविण्यात येणार आहेत. मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एफसीआय गोदाम कोरेगाव पार्क येथे तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे.
लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले.
निवडणुकीसाठी पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण – अमितेश कुमार
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहर आयुक्तालयात 3 हजार 287 मतदान केंद्र असून त्यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघातील 430 मतदान केंद्र आहेत. 16 संवदेनशील मतदान केंद्र आहेत. याकरीता 7 हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
आदर्श आचारसंहितेची अतिशय पारदर्शक, प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याकरीता पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. निवडणुकीवर प्रभाव पाडणाऱ्या बाबीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येत आहे.
‘सी-व्हिजील’ ॲप आणि ‘सुविधा’ संकेतस्थळावरील तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात असून, याकरीता पुणे शहर पोलीस दल सज्ज आहे, असेही श्री. कुमार म्हणाले.
अडीच हजारापेक्षा अधिक व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई – विनयकुमार चौबे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. चौबे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 1 हजार 854 मतदान केंद्र असून त्यात प्रामुख्याने मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने 1 डिसेंबर 2023 पासून आतार्यंत 2 हजार 500 पेक्षा अधिक आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई, एमपीडीएअंतर्गत 13, मोक्का कायद्याअंतर्गत 18 संघटनेवर कारवाई करुन 99 आरोपींना अटक, तसेच 95 आरोपींना हद्दपार, शस्त्र जमा करणे अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.
यापुढेही आदर्श आचारसंहितेचे अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे, असेही श्री. चौबे म्हणाले.
निवडणुकीसाठी सुरक्षा आराखडा तयार – पंकज देशमुख
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, पुणे ग्रामीण पोलीस विभागाअंतर्गत शिरुर, बारामती मावळ असे तीन लोकसभा मतदारसंघ असून 3 हजार 102 मतदान केंद्र आहेत. याकरीता लागणारे पुरेसे मनुष्यबळ असून बारामती व शिरुर लोकसभा निवडणुकीच्याकरीता अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

 

या मतदासंघात 5 संवदेनशील मतदान केंद्र आहेत. जानेवारीपासून 22 अवैध शस्त्रधारकांकडून शस्त्रे जमा करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आराखडा तयार करण्यात आला असून विविध गुन्ह्याअंतर्गत असलेल्या आरोपी तसेच अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीकरीता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दल सज्ज असून निवडणुक अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.