Lonavala : बेकायदेशीरपणे लावलेले रिक्षा स्टँडचे फलक तात्काळ काढा; नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या बांधकाम विभागाला सूचना

जागा दिसेल तेथे रिक्षा स्टॅड करणार्‍यांवर कारवाई करण्याची सभेत केली होती मागणी

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत असताना जागा दिसेल तेथे रिक्षा स्टॅड तयार करत वाहतुकीला अडथळा करणार्‍यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी लोणावळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी व्यक्त केली. यावर जागोजागी रिक्षा स्टॅडचे बेकायदेशिरपणे लावण्यात आलेले बोर्ड तात्काळ काढून टाकण्याच्या सूचना नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

पर्यटनस्थळ असल्याने लोणावळा शहरात फिरायला येणार्‍या पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यातच स्थानिक वाहनांची देखील गर्दी असल्याने वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. यामध्ये रिक्षांची मोठी भर पडू लागली आहे.

बाजारभाग असो वा मुख्य रस्ते जिथे जागा दिसेल तिथे रिक्षा थांबा सुरु करण्याचे सत्र सुरु झाल्याने शहरात शेकडो बेकायदेशीर थांबे सुरु झाले आहेत. त्यातच रिक्षाचालकांकडून प्रवासी दर देखील  जास्त आकारला जात असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

त्यातच रिक्षाचालक हे मनमानी पध्दतीने वाहने चालवत वाहतूककोंडीत भर घालत असल्याने हे सर्व बेकायदेशीर थांबे बंद करण्यात यावेत, अशी मागणी सभागृह‍ाच्या वतीने करण्यात आली आहे. सर्व नगरसेवक या मागणीचे निवेदन लोणावळा शहर पोलीसांना देणार आहेत.

वाहनतळांच्या जागा तात्काळ खुल्या करा
शहरात वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध नसल्याने वाहने सर्रास रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. याबाबत सभागृहात नगरसेवक भरत हारपुडे आणि आरोही तळेगावकर यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर शहरातील वाहनतळास योग्य जागा तात्काळ मोकळ्या करुन त्याठिकाणी वाहनतळ सुरु करण्याच्या सू चना नगराध्यक्ष जाधव यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.