Lonavala : सकल मराठा समाजातर्फे 9 आॅगस्टला लोणावळ्यात रेल्वे रोको

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने 9 आॅगस्ट क्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवत रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार येणार आहे. सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने ही घोषणा करण्यात आले आहे.

9 आॅगस्ट रोजी होणारे आंदोलन अहिंसा व शांततेच्या मार्गाने करण्याकरिता नुकतीच नियोजनाची बैठक लोणावळ्यात पार पडली. या बैठकीत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मराठा समाजाला मार्गदर्शन करत आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन केले.

सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीणचे कार्यकर्ते, पदाधिकारी गुरुवारी (दि. 9) क्रांतीदिनी सकाळी 9 वाजता भाजीमार्केट येथील शिवाजी चौकात एकत्रित जमणार आहेत. त्या ठिकाणी पाच कुमारिका छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात होईल. भाजी मार्केट ते गवळीवाडा नाका, तेथून रेल्वे स्थानक असा मोर्चाचा मार्ग असणार आहे.

रेल्वे स्थानकावर काही काळ घोषणाबाजी व रेल्वे रोको करण्यात येणार आहे. यानंतर सर्व मोर्चेकरी शिवाजी महाराज चौकात संसार मांडून जेवण करणार, तदनंतर भजनी मंडळांची भजने चौकात होतील व सायंकाळी पाच वाजता राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल अशी माहिती देण्यात आली. बंद हा शांततेच्या मार्गाने करायचा असल्याने कोणीही दगडफेक, जाळफोड, शिवीगाळ असे प्रकार करु नयेत, मोर्चामधील महिला भगिनींची काळजी घ्यावी, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. लोणावळ्यातील व्यापारी संघाने बंदला पाठिंबा दर्शविला असून दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवत मराठा समाजासोबत राहण्याचे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.