Lonavala News : लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी; सर्वत्र वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज – कोरोना साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने व जिल्हाधिकारी पुणे यांनी लोणावळा परिसरात विकेंड लाॅकडाऊन लागू केलेला असला तरी आखाड पार्टी करण्यासाठी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे.

कालपासून लोणावळ्यातील रस्ते पर्यटक वाहनांनी फुल झाले आहेत. शनिवार व रविवारच्या सुट्टया एन्जॉय करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळा, खंडाळा परिसरात तसेच ग्रामीण भागात दाखल झाले असल्याने बहुतांश हाॅटेल व बंगले फुल झाले आहेत. लोणावळ्यात पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी असली तरी देखील पर्यटक चेकपोस्टवर विविध कारणे सांगून पर्यटनस्थळांपर्यत जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे. खंडाळा भागातील राजमाची पाॅईंट, अमृतांजन पुलावरील ड्युक्स नोज पाॅईंट, सनसेट पाॅईंट याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत सेल्फी घेताना दिसत होते.

सोमवार पासून श्रावण महिना सुरू होणार असल्याने शनिवार व रविवार हे दोन दिवस मज्जा करण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. कोठेही मास्कचा वापर नाही की सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही अशा परिस्थिती मध्ये रस्त्यावर व कुमार चौकात पर्यटक फिरताना दिसत होते. पर्यटक वाहनांमुळे झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर पोलीस कर्मचारी व वाॅर्डन काम करत होते. तर भुशी धरण व लायन्स पाॅईंटकडे जाणार्‍या मार्गावर लोणावळा धरणाजवळ चेकपोस्ट लावत शहर पोलीस पर्यटनस्थळ बंदी आदेशाचे पालन करत पर्यटकांना माघारी पाठवत होते. असे असताना बुकिंग व अन्य कारणे सांगून पुढे जाणारे पर्यटक सहारा पुल व लायन्स पाॅईंट परिसरात गर्दी करताना दिसून येत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.