Lonavala News : कार्ला फाटा ते वेहेरगाव रस्ता पाण्याखाली

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरासह कार्ला परिसरात पावसाने दोन तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला असल्याने कार्ला फाटा ते वेहेरगाव हा रस्ता चार ते पाच ठिकाणी पाण्याखाली गेला आहे.

कार्ला फाटा ते वेहेरगाव हा पुर्वी खड्डेमय असलेला रस्ता सध्या चांगल्या स्थितीमध्ये असला तरी हा रस्ता बनविताना मोर्‍यांची कामे योग्य प्रकारे झाली नाहीत. सोबतच रस्त्याच्या लगत झालेल्या बांधकामांमुळे पाण्याचा प्रवाह काहीसा बाधित झाला आहे. यावर्षी पावसाळापूर्व कामात नाले सफाई न झाल्याने कार्ला फाटा ते वेहेरगाव हा दोन किमीचा रस्ता साधारण चार ते पाच ठिकाणी पाण्याखाली गेला आहे.

त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. कोरोनामुळे या भागात पर्यटनबंदी आहे. तसेच शाळा बंद असल्याने शाळकरी विद्यार्थी घराबाहेर पडत नसले तरी सकाळी व सायंकाळी दूध घेऊन जाणारे दुग्ध व्यावसायिक, कामगार, भाजीपाला व इतर कामांसाठी बाजारहटाला जाणारा महिला वर्ग या सर्वांना या पाण्यातून जावे लागत आहे.

वेहेरगाव व दहिवली या दोन्ही गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक ग्रामपंचायती व नागरिक यांनी पुढाकार घेत ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्ला ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कार्ला फाटा येथील मोर्‍या नविन केल्याने यावर्षी कार्ला फाट्यावरील पाणी साचण्याची समस्या सुटली आहे.

याच धर्तीवर वेहेरगाव रस्त्यावरील समस्या सोडविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासह, भाजे, पाटण, देवले, मळवली भागातील खराब झालेले रस्ते किमान तात्पुरती डागडुजी करत नागरिक‍ांना प्रवासायोगे करणे गरजेचे आहे; अन्यथा खड्डेमय रस्त्यावर वाहनांचा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.