Lonavala : टाकवे गावातील भाजी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह

vegetable seller in Takve village was Corona positive : कार्ला फाटा परिसर दहा दिवसासाठी बंद

एमपीसीन्यूज : कार्ला फाटा ( ता. मावळ) येथे भाजी विक्रीचा व्यावसाय करणार्‍या टाकवे खुर्द गावातील 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल आज, शुक्रवारी पाॅझिटिव्ह आला. त्यांच्या हायरिस्क संपर्कातील 9 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून खबरदारी म्हणून कार्ला फाटा परिसर दहा दिवसासाठी बंद करण्यात आला आहे.

यासह टाकवे खुर्द गावाला कंटेन्मेंट झोन व फांगणे गावाला बफर झोन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे व कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र‍ाच्या आरोग्य अधिकारी भारती पोळ यांनी दिली.

टाकवे खुर्द येथे राहणारी संबंधित व्यक्ती कार्ला फाटा येथे भाजी विक्रीचा व्यावसाय करते. मागील काही दिवसात भाजीपाला आणण्याकरिता ते दररोज पुणे, खेड, मंचर येथे गेले होते.

त्यांना निमोनिया सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने काल, गुरुवारी तळेगाव येथील मायमर हाॅस्पिटलमध्ये त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज, त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला.

वेहेरगाव, शिलाटणे या गावानंतर आता टाकवे गावात देखील रुग्ण सापडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच कार्ला फाटा येथे त्यांच्या दुकानावरून भाजी खरेदी करणार्‍यांच्या पोटात भितीने गोळा आला आहे.

सदर भाजी विक्रेत्याच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यापैकी कोरोनाची लक्षणे दिसणात्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.