Los Angeles : दक्षिण कोरियाच्या “पॅरासाईट”ची ऑस्करवारी!

एमपीसी न्यूज – सिनेमा विश्वातील प्रतिष्ठित 92 व्या ऑस्कर पुरस्काराचा वितरण समारंभ दि. 9 फेब्रुवारी रोजी लॉस अँजेलिसमध्ये पार पडला. हॉलीवूडच्या डॉल्बी थिअटरमध्ये हा नयनरम्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पहिल्यांदाच बिगर इंग्रजी चित्रपटाने एका पेक्षा जास्त ऑस्कर जिंकण्याची किमया केली आहे.

दिग्दर्शक बोंग जून-हो यांच्या ‘पॅरासाईट’ चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांची भरगोस कमाई करत चार पुरस्कार खिशात घातले. ‘पॅरासाईट’ या कोरियन चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासहित, उत्कृष्ट दिग्दर्शक, ओरिजनल पटकथा आणि उत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट असे एकूण चार पुरस्कार मिळाले. ऑस्कर पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यादाच एका बिगर इंग्रजी चित्रपटाने एका पेक्षा जास्त ऑस्कर जिंकण्याची किमया करून दाखवली आहे.

यंदाच्या ९२ व्या ऑस्कर पुरस्काराचा दिमाखदार सोहळा दि ९ फेब्रुवारी रोजी लॉस अँजेलिसमधील हॉलीवूड च्या डॉल्बी थिअटरमध्ये पार पडला. निर्माता क्वाक सिन आय व दिग्दर्शक बोंग जून-हो यांच्या ‘पॅरासाईट’ या चित्रपटाला ऑस्करसाठी एकूण सहा नामांकने मिळाली होती. त्यापैकी चार पुरस्कारवर त्यांनी शिक्कामोर्तब केला.

कोरियन भाषेत असणाऱ्या ‘पॅरासाईट’ चित्रपटाचा या अगोदर कान फिल्म फेस्टिवल २०१९ मध्ये प्रेमियर करण्यात आला होता.याचबरोबर ओरिजनल पटकथा यासाठी बाफ्टाचा पुरस्कार हि या चित्रपटाने जिंकला आहे. ‘पॅरासाईट’ हा सिनेमा काल्पनिक असला तरी समाज्यातील वास्तवावर तो नेमके बोट ठेवतो आणि एक अप्रतिम कलाकृती आपल्यासमोर सादर करतो. सामाजिक विषमता, गरीब श्रीमंत यामध्ये असणारी दरी तसेच मूलभूत गरजा व भांडवलशाहीवर प्रकर्षाने भाष्य करतो. सिनेमा मूळ कोरियन भाषेत असला तरी भाषेच्या सर्व मर्यादा ओलांडून तो जगातील प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडून जातो. ‘पॅरासाईट’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ परजीवी असा होतो. दोन वेगवेगळ्या कुटुंबाच्या या कहाणीत एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाच्या जीवावर कसे परवलंबी जीवन जगते?. हा ‘पॅरासाईट’च्या कुथेचा मूळ गाभा आहे.

किम आणि पार्क या दोन कुटुंबाची कहानी या सिनेमाद्वारे दाखवण्यात आली आहे. चार लोकांचे असणारे किम कुटुंब बसेमेन्टमध्ये घर करून राहत असतात. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या किम कुटुंबात कोणी नोकरी करत नाही न त्यांच्याकडे दुसरा कोणताही पैसे कमवण्याचा मार्ग उपलब्ध आहे. दुसरीकडे पार्क कुटुंब हे गर्भ श्रीमंत असून आलिशान घरात राहत असतात. वेगवेगळ्या मार्गांनी किम कुटुंब पार्क कुटुंबात कसे प्रवेश मिळवतात आणि ‘पॅरासाईट’ या शब्दाचा खरा अर्थ दिग्दर्शक आपल्याला कसा समजावून सांगतो, हे पाहणे खऱ्या अर्थाने औत्सुक्याचे आहे. प्रत्येक सीन सिनेमाची रंगत वाढवणारा तर आहेच पण, या सगळ्या प्रवासात दिग्दर्शक तुम्हाला हाताला धरून प्रसंग अनुभवायला भाग पाडतो, हे विशेष.

‘पॅरासाईट’ अनेक कारणांनी विशेष व महत्वाचा ठरतो. एक तर दिग्दर्शक बोंग जून-हो याचा उत्तम कलेचा आणि दिग्दर्शनाचा अविष्कार म्हणून हा सिनेमा आवर्जून पाहावा असाच आहे. सिनेमाची कथा काल्पनिक असली तरी ती समाज्यातील कित्येक विषमतेवर परखड भाष्य करते. ज्याला इंग्रजीमध्ये सोशिअल अँड इकॉनॉमिक डीव्हायड म्हणजेच सामाजिक आणि आर्थिक दरी म्हणतात त्याच उत्कृष्ट वर्णन या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सामान्य लोकांच्या जगण्यासाठीच्या संघर्षाची कहानी म्हणजे ‘पॅरासाईट’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.