Madhur on Nepotism: घराणेशाही फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर सर्वत्र आहे…

Madhur Bhandarkar: Nepotism is everywhere, not just in Bollywood...

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज महिना पूर्ण झाला. त्यानंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरुन वाद निर्माण झाला. येथे स्टारकिडसना जास्त महत्व दिले जातो. आउटसायडरला येथे प्रस्थापित होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. निर्माता दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सलमान खान, अभिनेत्री आलिया भट्ट, सोनम कपूर यांना नेपोटिझम बद्दल जोरदार ट्रोल केलं जाऊ लागलं. या प्रकरणावर आता प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घराणेशाही फक्त बॉलिवूडमध्येच आहे असं नाही तर ती सगळ्या क्षेत्रात आहे, असं मत व्यक्त करत असतानाच त्यांनी इंडस्ट्रीत काही बदल होत असल्याचंही सांगितलंय.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही, मक्तेदारी, गटबाजी या सर्व गोष्टी आहेत. मी स्वत: व्हिडीओ कॅसेट्स विकून इथवर आलोय. चांदनी बार ते इंदू सरकार, असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणून मी माझ्या ताकदीवर इंडस्ट्रीत उभा आहे. मी माझ्या मूल्यांना अनुसरुन काम केलं. पण इंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांना मी हे नेहमी सांगत आलोय की नवीन प्रतिभेला पायदळी तुडवू नका. त्यांच्यावर दबाव आणू नका आणि त्यांच्याविरोधात गटबाजी करु नका’.

‘नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला पाहिजे. सुशांत, शाहरुख आणि माझ्यासारखे लोक या इंडस्ट्रीत आहेत. तर दुसरीकडे असेही स्टारकिड्स आहेत, जे यशस्वी ठरले नाहीत. इथे गटबाजी खूप होते. एखाद्याचा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर त्याला कसं खाली पाडायचं, हे सर्व इथे चालतं आणि माझ्या चित्रपटांमधून मी हे सत्यसुद्धा मांडलंय. घराणेशाही इथे आहे आणि पुढेही राहणार. पण बाहेरुन आलेल्या कलाकारांना किमान त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी तरी मिळायला पाहिजे. त्यांच्याविरोधात गटबाजी होणं चुकीचं आहे. आता सुशांतच्या आत्महत्येनंतर किमान इंडस्ट्रीमधील लोक आत्मचिंतन तरी करत आहेत. या गोष्टी कशाप्रकारे कमी करता येतील, यावर विचार सुरु आहे’, असं त्यांनी म्हटलं.

मधुर भांडारकर यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक नव्या कलाकारांना संधी दिली. ग्लॅमर विश्व अत्यंत क्रूर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. इथे प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही, असंही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.