-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maharashtra Unlock : महाराष्ट्रात 5 टप्प्यांत अनलॉक होण्याची शक्यता

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यात  अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला दिल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यासाठी जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे. या माहितीनुसार ज्या जिल्ह्यात 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन बेडची मर्यादा 25 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक करण्यात येईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकाने किंवा रेल्वे देखील सुरु होतील.

यासाठी जिल्हे आणि महानगरपालिकांचे मिळून एकूण 43 भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

“पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमधील सर्व निर्बंध काढले जाऊन तेथील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना 100 टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील 100 टक्के उपस्थितीची परवानगी असेल”, असेही त्यांनी सांगितले.

या कामासाठी दर शुक्रवारी आकडेवारीचा आढावा घेऊन जिल्ह्यांच्या वर्गवारीमध्ये बदल केला जाणार आहे. तसेत आत्ताच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यांची वर्गवारी 5 टप्प्यांत केली असून यापुढे जशी जिल्ह्यांमधली कोरोनाची आकडेवारी बदलेल, त्यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी देखील एक ते पाच अशा टप्प्यांमध्ये बदलेल, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यांची वर्गवारी – 

1. पहिल्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची मर्यादा असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

2. दुसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 ते 40 टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची मर्यादा असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.

3. तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 40 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची मर्यादा असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

4. चौथ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये 10 ते 20 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 60 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची मर्यादा असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

5. पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि 75 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची मर्यादा असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे. वरील 4 टप्प्यांमध्ये नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील गटात करण्यात आला आहे.

यानंतर राज्य सरकारने हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थांबलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल कराण्यासंदर्भांत निर्णय घ्यावे लागतील. असे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn