Pune : देवेंद्र फडणवीस आपल्या जबाबदारीपासून अक्षरश: पळ काढत आहेत – पृथ्वीराज चव्हाण 

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाचा विषय कनिष्ठ सहकाऱ्यांकडे सोपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या जबाबदारीपासून अक्षरश: पळ काढत आहेत, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्याप पटलावर ठेवलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळणार याबाबत अद्याप संभ्रम आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घेतला पाहिजे. त्यापासून पळ काढून चालणार नाही, अशी खरमरीत टोलाही त्यांनी लगावला. 

मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा आदेश राज्य सरकारने गुरुवारी जारी केला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. राज्याच्या इतिहासात आजवर असा शासननिर्णय काढण्यात आलेला नाही. मराठा समाजाचा प्रश्न कनिष्ठ सहकाऱ्यांकडे सोपविला जात आहे. या समितीने चुकीचा निर्णय घेतल्यास त्याला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, अशी टीकाही त्यांनी केली. सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.