Pune : मराठीतील साहित्यिकांनी केले मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत

सेवा मित्र मंडळातर्फे शाळेच्या पहिल्या दिवशी अनोखा कार्यक्रम

एमपीसी न्यूज- स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालण्याचा पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थी संख्येची उदासिनता दिसून येत आहे. इंग्रजी भाषा गरजेची असली तरी देखील मराठी भाषा ही तितकीच महत्वाची आहे, याचे महत्व सांगण्यासाठी मराठीतील साहित्यिकांनी पुणे महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनो मराठी शाळेमध्ये तुमचे स्वागत आहे, असे म्हणत मराठी माध्यमांच्या शाळांचे महत्व पटवून देण्यासाठी गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेत अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळयाचे आयोजन केले होते.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्या निकेतन प्रशाला क्रमांक १ तसेच वसंतदादा पाटील माध्यमिक विद्या निकेतन या प्रशालेत शाळेच्या पहिल्या दिवशी मराठी साहित्यिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, लोककलावंत शाहीर हेमंतराजे मावळे, साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार अशा दिग्गज साहित्यिकांनी मुलांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, समग्र शिक्षण अभियान प्रकल्प अधिकारी शिल्पकला रंधवे, शाळेचे मुख्याध्यापक सादिक अत्तार, माजी विद्यार्थी नितीन पंडित आदी उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “मराठी भाषेची गोडी लावण्याचे काम जितके शाळेतील शिक्षकांचे आहे तितके साहित्यिकांचे देखील आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले पाहिजेत आणि अशा उपक्रमात साहित्यिकांनी देखील सहभाग घेतला पाहिजे”

प्रा. मिलींद जोशी म्हणाले, “आपण जसे आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो तसेच मराठी भाषेवर देखील प्रेम करा. मराठी भाषा बोला आणि ती जगा देखील. पुस्तकांचे सामर्थ्य इतके आहे की पुस्तकांचे पंंख लावून तुम्ही आकाशात उंच भरारी घेऊ शकता”

शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत रेवडी व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, प्रशांत जाधव, लालसिंह परदेशी, सागर पवार, ज्योती ढमाळ, विजया पवार, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शालिनी सोनावणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भरेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.