BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : नाणेकरवाडी येथे नवविवाहितेची आत्महत्या ; कारण अस्पष्ट 

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – खोलीचा दरवाजा आतून बंद करून कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता खोलीतील छतावरील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने कामगाराच्या अठरा वर्षीय पत्नीने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाणेकरवाडी ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील ज्ञानेश्वर कॉलनीत बुधवारी ( दि. 9 जानेवारी ) रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. मात्र, सबंधित विवाहितेने अगदी टोकाचा निर्णय घेवून केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने येथील पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे.

सुवर्णलता कृष्णा स्वामी ( वय – 18 वर्षे, सध्या रा. अमोल डांगले यांची खोली, ज्ञानेश्वरकॉलनी, नाणेकरवाडी, ता. खेड ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. खोलीचे मालक अमोल ज्ञानेश्वर डांगले ( वय – 28 वर्षे, रा. नाणेकरवाडी ) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डांगले यांच्या नाणेकरवाडी येथे ज्ञानेश्वर कॉलनीत खोल्या असून, त्या भाडेकरूंना राहण्यासाठी भाड्याने देण्यात आल्या आहेत. गेल्या दीड महिन्यांपूर्वी कृष्णा चंद्र स्वामी हा त्याची पत्नी सुवर्णलता हिच्या समवेत दुसऱ्या मजल्या वरील खोली क्रमांक एक मध्ये भाड्याने राहण्यासाठी आला होता. कृष्णा हा नाणेकरवाडी हद्दीतील शार्प इंजिनीअरिंग या कंपनीत वेल्डरचे काम करतो. बुधवारी ( दि. 9 जानेवारी ) रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान खोलीत कोणी नसताना सुवर्णलता हिने कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता खोलीचा दरवाजा आतून बंद करून खोलीतील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. त्यानंतर तिचा बाहेरून आलेला पती कृष्णा हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करूनही दरवाजा उघडला जात नसल्याने दरवाजा मध्ये बसून मोठमोठ्याने रडत बसला. याचा आवाज ऐकून डांगले हे त्याच्याजवळ आले असता त्यांनाही खोलीचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता वरील प्रकार त्यांच्या दृष्टीस पडला. त्यांनी नागरिकांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

चाकण पोलिसांना याबाबतची माहिती कळविताच घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या येथील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने सुवर्णलता हिचा छताच्या पंख्याला लटकलेला मृतदेह खाली उतरविला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. सुवर्णलता हिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने येथील पोलिसांनी गु.र.नं. 10/2019 नुसार, सीआरपीसी 174 प्रमाणे आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.