Marunji Crime News : पेट्रोलचे पैसे मागितल्याने पेट्रोल पंपावरील कामगारावर विळ्याने वार

एमपीसी न्यूज – दुचाकीत भरलेल्या पेट्रोलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन जणांनी मिळून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यासोबत भांडण करून त्याच्यावर विळ्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी मारूंजी येथे घडली.

अविनाश शिवाजी पाटील (वय 25, रा. मारूंजी, ता. मुळशी) असे पेट्रोल पंपावरील जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी याबाबत शुक्रवारी (दि. 16) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

प्रज्वल संदीप शेलार (वय 19) आणि कृष्णा शिवाजी गायकवाड (वय 20, दोघेही रा. गुलमोहन कॉलनी, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी शेलार याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश पाटील हे मारूंजी येथील राजमुद्रा पेट्रोल पंपावर कामाला आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी शेलार आणि गायकवाड हे दोघेजण दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल भरल्यावर फिर्यादी अविनाश यांनी पेट्रोलचे पैसे मागितले. या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ केली. आरोपींनी त्यानंतर पैसे दिले.

मात्र, शिवीगाळ करू नका, असे फिर्यादी यांनी आरोपींना सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी अविनाश यांच्यावर दुचाकीमधून काढलेल्या विळ्याने तोंडावर वार करून गंभीर जखमी केले.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.