Maval: मुंबईहून नागाथलीत आलेली व्यक्ती कोरोना ‘पॉझिटीव्ह’ तर माळवाडीतील नर्सलाही मिळाला डिस्चार्ज

Maval: A person came from Mumbai to Nagathali, detected Corona 'positive', While nurse from Malwadi discharged from hospital

एमपीसी न्यूज – मुंबईहून आंदर मावळातील नागाथली येथे काल पहाटे आलेली एक 42 वर्षीय व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मावळच्या ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे मावळात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबईतून मावळात आलेले असल्याने मावळात आणखी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईतून मावळात येणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, तळेगाव येथील नर्स पाठोपाठ माळवाडी येथील नर्सनेही कोरोनावर मात केली असून तिला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मावळातील अहिरवडे येथे काल एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्या पाठोपाठ आज आंदरमावळातील नागाथली येथे कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले असतानाच नवीन दोन रुग्ण सापडल्याने तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोनवर स्थिर राहिली आहे.

कोरोना रुग्ण आढळल्यामुळे नागाथली गाव कन्टेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी आज काढले. नागाथलीपासून पाच किलोमीटरच्या परिक्षेत्रातील कुसवली, शिंदे वस्ती व वहानगाव ही गावे बफर झोनमध्ये राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

नागाथली येथे काल पहाटे एक 42 वर्षीय व्यक्ती मुंबईवरून दाखल झाली. या व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने कोरोना संशयित म्हणून औंध येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी झालेल्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात ती व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या परिवारातील चारजणांना तसेच त्या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या पाच अशा एकूण नऊजणांना आज (बुधवारी) संध्याकाळी पुण्याच्या ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण समितीच्या सदस्यांनी गावात येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून संशयित कोरोना रुग्णांची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी. त्यामुळे मावळातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य होईल, असे तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

तळेगाव येथील नर्सच्या पाठोपाठ माळवाडीतील नर्सचा खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तळेगाव परिसरात खळबळ उडाली होती. या दोन्ही नर्सच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्याही करवून घेण्यात आल्या. त्यात सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तळेगावातील नर्सला गेल्या आठवड्यात डिस्चार्ज मिळाला. माळवाडीतील नर्सलाही आज घरी सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.