Maval: माजी मंत्र्याने युवा आमदाराला ‘चमकू’ म्हणणे खेदाचे – बबनराव भेगडे

'पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनील शेळकेंचे अहोरात्र काम; सर्वांना विश्वासात घेऊन कोरोनाच्या मोहिमेवर कार्यरत' Maval: It is unfortunate that the former minister called the young MLA as a Shiner - Babanrao Bhegade

एमपीसी न्यूज – निवडणुकीत 94 हजारांच्या मताधिक्याने विजयी झालेल्या युवा आमदाराला तालुक्यातील माजी मंत्र्याने ‘चमकू आमदार’ म्हणणे ही खेदाची बाब असल्याचे प्रत्युत्तर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिले. दिल्ली ते गल्लीत भाजपाचे नेते अशी वक्तव्ये करत असतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

वडगाव मावळ येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी आमदार सुनील शेळके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

कोरोना लॉकडाऊनमुळे मावळ तालुक्यात एकही माणूस औषध, अन्नधान्य अशा कोणत्याच सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके अहोरात्र कष्ट करून सलग 45 दिवस आधार देत कर्तव्य भावनेतून काम करत आहेत, कोरोनाच्या परिस्थितीत टीका व राजकारण करण्याची वेळ नाही. आमदार सुनील शेळके यांनी अहोरात्र 45 दिवस काम केले. पण माजी  राज्यमंत्री बाळा भेगडे हे 45 दिवसात 15 तासही बाहेर पडले नाहीत, असे भेगडे यांनी यावेळी सांगितले.

भेगडे पुढे म्हणाले, की आमदार सुनील शेळके यांनी स्वखर्चाने दहा हजार अन्नधान्य कीट तयार करून एक महिना पुरेल एवढे वाटप केले आहे. अनेक दानशूरांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करून असे समाधानाचे काम केले.

वारकरी, बेरोजगार, आरोग्य सेवा, ज्यांची आर्थिक स्थिती हालाखीची असेल अशा लोकांना साडेचार वर्षांत पदरमोड करून शेळके यांनी भरभरून मदत केली. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्याकडे मावळचा आशेचा किरण म्हणून लोकं पाहत आहेत, असेही भेगडे म्हाले.

आज मोठे संकट आहे. जनता भयभीत झालेली आहे. अशा प्रसंगी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचे पुढारी फक्त टीका करायचं काम करत आहेत, असा शेराही भेगडे यांनी मारला.

पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, तालुका ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, पंचायत समितीचे सदस्य व गटनेते साहेबराव कारके, सदस्य महादु उघडे, तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, चंद्रजीत वाघमारे, राजेश राऊत, विजय काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘चमकदार कामगिरी आमदारांची’
सुनील शेळके यांनी स्थानिक आमदार निधीतून 50 लाखापैकी 34 लाख रूपयांची औषधे व साधने उपलब्ध करून दिली आहेत. तालुक्यात सहा ठिकाणी शिवभोजनालये सुरू केलीत. पाच रूपयांत भोजन देण्याचा धाडसी निर्णय राज्य शासनाने घेतला असून आमदार शेळके त्याची अंमलबजावणी करत आहेत. या व्यतिरिक्त मोफत अन्नछत्रालये सुरू करून गरजूंना प्रेमाचा घास दिला आहे, असे बबनराव भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.