Maval LokSabha Elections 2024 :  मावळात पहिल्यांदाच ‘घड्याळ’ नसणार!

एमपीसी न्यूज – पुणे आणि रायगड जिल्ह्यात ( Maval LokSabha Elections 2024) विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली. त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात होता. परंतु, आता महायुतीत मावळ मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने यावेळी मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नाही. त्यामुळे ईव्हीएमवर घड्याळ नसणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदाच शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करावे लागणार आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत असे सहा विधानसभा मतदारसंघ घेऊन मावळची निर्मिती झाली. मावळमध्ये असलेले पिंपरी,चिंचवड एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला. बालेकिल्ला असतानाही पाडापाडीच्या खेळात एकदाही राष्ट्रवादीला यश मिळविता आले नाही.

Pune : नंदकुमार मुरडे लोकमान्य टिळक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित

पहिली निवडणूक शिवसेनेचे दिवंगत गजानन बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर आझम पानसरे यांच्यात झाली. त्यात पानसरे यांचा पराभव झाला. दुसरी निवडणूक शिवसेनेचे श्रीरंग बारणे-शेकापकडून मनसेच्या पाठिंब्यावर लढलेले दिवंगत लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राहुल नार्वेकर यांच्यात झाली. त्यात बारणे विजयी झाले. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले नार्वेकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले होते. 2019 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात लढत झाली होती. बारणे यांनी दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पार्थ पवार यांचा पराभव केला होता.

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. मावळवर तिन्हीवेळेस एकत्रित शिवसेनेचे वर्चस्व राहिले. तिन्हीवेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत झाली होती. आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महायुतीत भाजपसोबत आहेत. त्यामुळे मावळमधील राजकीय समिकरणे बदलली आहेत.

महायुतीमधील मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिका-यांनी जागेवर दावा केला होता. परंतु, महायुती मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिला असून खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. अजित पवार यांना घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव मिळाले आहे. महायुती मावळ शिवसेनेला सुटल्याने 15 वर्षात पहिल्यांदाच मावळमध्ये घड्याळ चिन्ह नसणार आहे. मतदारसंघाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा मावळात उमेदवार राहणार नाही. मतदान यंत्रावर घड्याळ चिन्ह दिसणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धनुष्यबाणाला मतदान करावे लागणार ( Maval LokSabha Elections 2024) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.