Maval: पैसे वाटपाचा धुमाकूळ; पार्थ पवारांचे पैसे वाटप करताना एकाला पकडले 

भरारी पथकाची पनवेलमध्ये कारवाई 

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात पैसे वाटपाचा धुमाकूळ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे पैसे वाटप करताना सलग दुस-या दिवशी कार्यकर्त्यांना पकडले आहे. पनवेलमीधल गोकुळधाम भागात आज (रविवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
प्रताप रामचंद्र आरेकर (वय 59 रा. सुकापूर. ता. पनवेल)असे पैसे वाटप करताना पकडून अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडे पार्थ पवार यांची स्लीप आढळून आली आहे. याप्रकरणी भरारी पथकाचे प्रमुख महेंद्र त्रिभुवनदास गगलानी (वय 56, रा. पनवेल, रायगड)यांनी नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • महेंद्र गगलानी भरारी पथकासह नेरे गावच्या परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी सुकापुर येथील गोकुळधाम सोसायटी परिसरात एकजण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैसे वाटप करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. भरारी पथकाने पैसे वाटप करणा-या प्रताप आरेकर याची झडती घेतली. त्याच्याकडे मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांची स्लीप आढळून आली आहे. तसेच, 200 रुपयांची 29 पाकिटेही प्रताप आरेकरकडून जप्त करण्यात आली आहेत. याबाबत निवडणूक आयोगाचे कर्मचारी पथक अधिक चौकशी करत आहे.
दरम्यान, प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर कालच कामोठे येथून पार्थ पवार यांच्यासाठी पैसे वाटणा-या शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर आज सलग दुस-या दिवशी पैसे वाटताना कार्यकर्त्याला पकडले आहे. पनवेल भागातून निवडणूक आयोगाच्या पथाकने आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.