Vadgaon News : किरीट सोमय्या यांचे आरोप अर्धवट माहितीवर आधारित, चौकशीस सामोरे जाण्यास तयार – आमदार शेळके

एमपीसी न्यूज – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे अर्धवट माहितीवर आधारित असून या संदर्भात कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत, असे प्रतिआव्हान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिले. 

मावळ तालुक्यातील आंबळे गावी बेकायदा गौणखनिजाचे उत्खनन करून आमदार सुनील शेळके यांनी शासनाचा 10 कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल (शुक्रवारी) तळेगाव दाभाडे येथे पत्रकार परिषद घेऊन केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. सोमय्या यांनी केलेल्या सर्व आरोपांचे शेळके यांनी खंडण केले.

आपण गेली 13-14 वर्षे शासनाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन हा व्यवसाय करीत आहोत. कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही अथवा शासकीय महसूल बुडविलेला किंवा थकविलेला नाही. कोणतीही कागदपत्रे न देता, पुरावे सादर न करता आरोप करणे चुकीचे आहे, असे शेळके म्हणाले.

सोमय्या यांनी आरोप केलेल्या 13 गट क्रमांकांपैकी केवळ 125, 136, 152 ,153, 154, 158, 154 या सात गट क्रमांकांच्या जमिनी आपल्या अथवा आपल्या कुटुंबाच्या मालकीच्या आहेत. उर्वरित गट क्रमांकांचा सात-बारा सोमय्या यांनी आपल्या नावावर करून द्यावा. त्यावरील शासकीय महसूल भरण्याची आपली तयारी आहे, असा टोला लगावत आपल्या मालकीच्या काही गट क्रमांकांवर शासकीय परवानगीने उत्खनन करण्यात आले आहे तर काही गट क्रमांकांवर  उत्खनन झालेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती देऊन आमदारकीसाठी भाजपचे पुन्हा तिकीट मिळविले. त्यांनीच खोटी माहिती देऊन सोमय्या यांना बोलवले व आरोप करायला लावले, असा आरोप आमदार शेळके यांनी केला.

सार्वजनिक जीवनात काहीही आक्षेपार्ह सापडत नसल्याने तसेच झपाट्याने सुरू असलेल्या विकासकामांना खीळ बसावी, या राजकीय हेतूने आपल्या वैयक्तिक व्यवसायांची माहिती वडगावमधील वकिलाच्या माध्यमातून काढण्याचे काम केले जात आहे. लोणावळा व तळेगाव नगरपालिकेतील भ्रष्टाचार आपण उघडकीस आणला. त्यांची चौकशी अंतिम टप्प्यात असून ती थांबविण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणून आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत. त्याला मी बळी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

सोमय्यांचा पाहुणचार करता आला नाही याचं दुःख

आपल्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांनी आपल्याला सांगितले असते तर आपण स्वतः त्यांच्या स्वागताला हजर राहिलो असतो. त्यांना हवी ती सर्व माहिती दिली असती. त्यांच्या डाव्या-उजव्या बाजूला बसलेल्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरून आरोप करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली नसती. कर नाही त्याला डर कशाला, त्यांनी परस्पर भेट दिल्याबद्दल  त्यांचे आदरातिथ्य करता आले नाही, याचे आपल्याला वाईट वाटले, अशी कोपरखळी मारली. तसेच स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविणे जमत नाही, म्हणून आपल्यावर राज्यपातळीवरून दबाव आणण्याची केविलवाणी धडपड राजकीय विरोधक करीत आहेत, असे शेळके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.