Shirur News: बैलगाडा शर्यतीच्या बैठकीला या; खासदार डॉ. कोल्हे यांनी फोन करून आढळरावांना दिले निमंत्रण

एमपीसी न्यूज – बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे यात कुठलाही पक्षभेद, वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय आड येता कामा नये. सर्वांनाच बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवायचा अशी भूमिका घेत शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वतः कॉल करुन बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी नव्याने रणनिती आखण्यासाठीच्या आजच्या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली.

बैलगाडा शर्यत बंदी विरोधात सर्वांची एकजूट दिसली पाहिजे. त्यामुळे सर्वच पक्षातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी यांची वज्रमूठ बांधून हा लढा द्यायचा हा मनोदय आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला सारून आवर्जून शिवाजीदादांना कॉल करून आपलंही मार्गदर्शन व्हावं अशी विनंती केली. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आपली वेळ घेऊन आपल्याकडे चर्चेसाठी येतो असे सांगितले. बैलगाडा शर्यती हा आपल्या दृष्टीने कुठल्याही श्रेयवादाचा विषय नसल्याने आपण पक्षभेद न बाळगता सामूहिक प्रयत्नांच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.