Maval News : विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्तींचे पावित्र्य जपावे – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देताना सर्वांनी गणेश मूर्तींचे पावित्र्य राखले जाईल, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. 

मावळ तालुक्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या मंडपातच अथवा मंदिरासमोर तर घरगुती गणपतींचे प्रत्येकाने घरामध्येच किंवा घराच्या  अंगणात, परसबागेत, टेरेसवर बादली, छोटा टब, छोट्या टाकीत अथवा विसर्जन हौदात शक्य असेल त्या ठिकाणी तसेच योग्य वाटेल त्या पद्धतीने विसर्जन करावे, मात्र कोणत्याही प्रकारे गणेशमूर्तीचे पावित्र्यभंग होणार नाही, विटंबना होणार नाही, याची प्रत्येक गणेशभक्ताने काळजी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.
नगर परिषद व काही स्वयंसेवी संस्थांनी मूर्तीदान स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. ज्या नागरिकांना मूर्तीदानाचा पर्याय योग्य वाटत असेल, त्यांनी तो पर्याय निवडावा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती लवकर विरघळत नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळण्यासाठी आवश्यक असणारे अमोनियम बाय कार्बोनेट नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहे. घरात विसर्जन केलेली मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळेल याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.