Maval: लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च वाचवून 90 कुटुंबांना दिला भाजीपाला

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील बोरज ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष केशव केदारी व शुभांगी संतोष केदारी यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 90 कुटुंबांना भाजीपाला दिला. कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्याची जाणीव ठेवून केदारी दाम्पत्याने हा निर्णय घेतला.

आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या उदात्त जाणीवेतून लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून व आमदार सुनील शेळके यांच्या ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमाने प्रेरित होऊन त्यांनी गरजूंना मदत केली. सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाने त्रस्त असून संपूर्ण देशात लॉकडाऊन  करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून त्यांना मदतीची गरज आहे, हीच गरज ओळखून संतोष केदारी यांनी नव्वद कुटुंबांना भाजीपाल्याचे वाटप केले.

‘आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा न करता सामाजिक जाणीव ठेवून केलेल्या मदतीमुळे एक प्रकारे समाधान मिळते’, असे यावेळी केदारी यांनी सांगितले.

याप्रसंगी ह.भ.प.गबळू केदारी, बाळू साठे, सायबा कडू, कंका केदारी, दत्तात्रय केदारी, माजी ग्रामपंचायत सदस्य हिरामण केदारी, मंगेश साठे, संतोष कडू, श्याम साठे, दशरथ कदम आदी मान्यवर तसेच बोरज गावठाण येथील हनुमान तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.