Maval : मावळवासीयांना रविवारी पदभ्रमंतीतून ऐतिहासिक कुसूर घाट जाणून घेण्याची संधी

एमपीसी न्यूज – मावळ अॅडव्हेंचर संस्थेच्या वतीने मावळवासीयांसाठी येत्या रविवारी ऐतिहासिक कुसूर घाटात पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला रविवारी (दि.3) सकाळी साडेआठ वाजता कुसूर गाव येथून प्रारंभ होणार आहे. 

इतिहासाचा अभ्यास करताणा घाट मार्गांचा उल्लेख येतोच. युद्ध मोहिमांच्या हालचाली, समुद्र मार्ग आलेल्या मालाची ने-आण, विविध व्यापारी यांचा येण्या-जाण्याचा मार्ग, धर्म प्रसार या करिता या घाटांचा वापर प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात केला जात असे.

या घाट मार्गांचा वापर करून तत्कालीन राज्यकर्ते राज्याकरिता जकातीच्या स्वरूपात संपत्ती जमा करत असत. घाट मार्गावरून होत असलेल्या व्यापाऱ्यांची व मालाची वाटमारी होऊ लागल्याने त्यांच्या सुरक्षिततेकरिता व लक्ष ठेवण्याकरिता या ऐतिहासिक घाट वाटांवर गडकिल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. तत्पूर्वी लेण्यांची निर्मिती झाली होती.

अशा या घाट वाटांचा वापर कमी होत गेल्यानंतर त्या अता विस्मरणात जाऊ लागल्या आहेत. या ऐतिहासिक घाटवाटांपैकी एक म्हणजे कुसूर घाट हा घाट जिवंत राहावा म्हणून मावळ अॅडव्हेंचर संस्थेच्या वतीने गेले अनेक वर्षापासून कुसूर घाट पुनरूज्जीवनाचे काम करत येत आहे. या घाटाची सर्वांना माहिती व्हावी, त्याचा इतिहास सर्वांना कळावा म्हणून ऐतिहासिक कुसूर घाट पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेत कुसूर घाटाबद्दल ऐतिहासिक नोदींचा उल्लेख असलेल्या कागदपत्रांची माहिती पदभ्रमण करते वेळी घाटात लावलेले मैलाचे दगड, घाटवाटाची माहिती घाटातून जाणाऱ्या वाटसरूस पाण्याच्या पाण्याची सोय म्हणून कातळातील टाक्यांची माहिती. अष्टकोनी पाण्याचे टाके, तसेच घाट पुनरूज्जीवन अनुभव, अशी माहिती देण्यात येणार आहे. तसेच यावेळी सह्याद्रीतील घाट वाटा व दुर्ग” या विषयावर इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांचे व्याख्यान होईल.

मोहिमेस येताना जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी स्वत: घेऊन यावा, अशा सूचना  मावळ अॅडव्हेंचरचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ जावळीकर यांनी दिल्या आहेत. मोहिमेत सहभागी होण्याकरिता अधिक माहितीसाठी 9226816755 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.