Meaning of National Pledge : अर्थ प्रतिज्ञेचा (भाग 5) – त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता….! 

एमपीसी न्यूज (प्रा. श्रीपाद भिडे) – पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञा छापलेली असते. ती नुसतीच तोंडपाठ असते, नाही का? जरी ही प्रतिज्ञा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाकरिता ही प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा व्हायला हवी आणि म्हणूनच आपण या प्रतिज्ञेचा, प्रतिज्ञेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या या विशेष लेखमालेतून समजावून घेणार आहोत.

नमस्कार मित्रांनो,

मागील लेखात आपण आपला देश किती विविध प्राचीन परंपरांच्या समृद्धतेने नटलेला आहे ते पाहिले. आपल्याला नुसत्या परंपरा माहित असून भागणार नाहीये. तर त्यांचा अंगीकार होतो आहे कि नाही हे पडताळून पहिले पाहिजे.

भारतात परकी सत्तेचा उत्पात आणि हिंदुत्त्वाचे अक्षरश: पतन सुरु झाले. त्याची सुरुवात झाली 1318 मध्ये यादवांच्या साम्राज्यनाशापासून. अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाने- मुबारिकने 1318 मध्ये हरपालदेव यादव याला जिवंतपणी अंगाची कातडी सोलून ठार मारले. त्याचा धसका एवढा जबरदस्त होता की, स्वकीयांच्या मनातील स्वराज्याची प्रेरणाच गाडून टाकली गेली. अवघा समाज तेजोहीन झाला. आणि आपला जन्म जणू गुलामगिरीकरिताच आहे ह्याचा पण निश्चय दृढ झाला.

अशा परिस्थितीत जनतेचा गमावलेला आत्मविश्वास आणि स्वाभिमान, धार्मिक कट्टरता, जागृत ठेवण्याचे कार्य केले ते आपल्या संतांनी. अशा शीलभ्रष्ट समाजाला सावरीत होता तो वारकरी संप्रदाय. मृतप्राय समाजात प्राणशक्ती भरण्याचे  त्यांच्या  मनाच्या मशागतीचे काम होते  ते संत, वारकरी. तीनशे वर्षांच्या अंधारानंतर नवी पहाट क्षितिजावर दिसू लागली होती ती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्यातून.

संत तुकाराम, शिवकालीन एक संत. स्वामिनिष्ठा हे पाईकाचे मोठे लक्षण. आपल्या धन्यावर आपली निष्ठा हवी. स्वामिकार्यापुढे आपला देह तृणवत वाटला पाहिजे. आपल्या कर्माने धन्याला कोणत्याही प्रकारचे उणेपण येता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे.

      तो एक पाईक पाईकां नाईक। भाव सकळीक स्वामिकाजीं || 

      विश्वासावांचूनि पाईकासी मोल। नाहीं मिथ्या बोललिया ||  

      तुका म्हणे नये स्वामी उणेपण। पाईक जतन करी त्यासी ||  

तुकोबांच्या ह्या अभंगाचा इथे असा संदर्भ लावता येईल कि,  आपण, आपल्या समृद्ध परंपराशी एकनिष्ठ असले पाहिजे. ते आपले स्वामीकार्य अर्थात देशकार्य आहे. आपल्या कोणत्याही कृत्याने आपल्या देशाला गालबोट लागता काम नये. आणि जर तसे झाले नाही तर तो देशाप्रती आपला विश्वासघात ठरेल आणि पुन्हा आपला ऱ्हास निश्चित आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता  माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन

समृद्ध अशा परंपरांच्या भारत देशाचा आपल्याला सार्थ अभिमान हवा. कोणतीही परंपरा व्यर्थ नाही. हा दृढ विश्वास मनाशी बाळगला पाहिजे. पराक्रमाच्या परंपरेमुळेच आपण आज स्वातंत्र्य अनुभवतो आहोत मोकळा श्वास घेतो आहोत ह्याचा क्षणभरही विसर पडता काम नये. त्या योध्यांचा,  स्वातंत्र्यसैनिकांचा आपल्या स्वार्थापोटी, उपयोग होता कामा नये.

आपले सण म्हणजे आपली मानसिक ताकद, आपल्या संस्कृतीचा भक्क्म पाया . आपल्या परंपरागत सणांचा आपल्याला आदरच असला पाहिजे. हल्ली आषाढ अमावस्येला सर्रास गटारी अमावस्या  म्हणायचा निर्लज्जपणा सुरु आहे. वास्तविक तो गताहारी अमावस्या आहे. तीच दीप अमावस्या. दिवा हे मांगल्याचे, तेजाचे प्रतीक आहे. आपल्या संस्कृतीत दिवा लावण्याची पद्धत आहे , तोंडाने तो विझवायचा नाही. पुढे येणारे चार महिने हे अतिपाऊस आणि त्यामुळे कमी प्रकाशाचे असतात आणि म्हणून वेळोवेळी दिव्याचा वापर होत असे. त्यावेळी दिवा घासून पुसून लख्ख हवा आणि तो सतत तेवत राहावा म्हणून त्याची मनोभावे पूजा.

एखादी गोष्ट सजीव असो वा निर्जीव हा भाग गौण तर प्रत्येकाच्या उपकाराची हि परतफेड झालीच पाहिजे एवढा गाढा उद्देश नक्कीच कोणत्याही संस्कृतीत नाही. आपल्या संस्कृतीने प्रत्येकाची परतफेड शिकवली आहे.  एवढी महान संस्कृती , मग तिचे पाईक व्हायला नको का?  कोणत्याही आपल्या सांस्कृतिक परंपरागत गोष्टीची खिल्ली न उडवता  त्या मागचा उद्देश जाणून घेऊन तो इतरांपर्यंत  कसा पोहोचवता येईल ह्याचा विचार व्हायला हवा.

आपल्याकडे एवढी मोठी परंपरागत ग्रंथसंपदा आहे . पण त्याबद्दलही आपल्याला पुरेशी माहिती नाही.  आपला धर्मग्रंथ कोणता? ह्याचे उत्तर बऱ्याच जणांना बुचकळ्यात टाकेल. बराच राष्ट्रांमध्ये आपापल्या धर्मग्रंथाच्या ओळखीनेच प्राथमिक शिक्षण सुरु होते. मानवाच्या जीवनाचे सार सांगणारे आपले धर्मग्रंथ असूनही आजही आपण त्यापासून दूर आहोत किंवा आपल्याला जाणीवपूर्वक लांब ठेवले गेले आहे. आपल्या संस्कृतीतील परंपरागत प्रत्येक लिखाण हे मानवाच्या कल्याणाकरिता लिहिलेलं आहे. तिथे जात, पात, धर्म, पंथ सारेच गौण आहे.

“विश्व स्वधर्म सूर्ये पाहो” हि शिकवण देणारी आपली संस्कृती मग तिने शिकविलेल्या मार्गाने आपण जायला नको का? योग्य पद्धतीने तिचे अनुसरण करायला नको का? त्याकरिता आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा सखोल, डोळस अभ्यास व अचूक ज्ञान हवे. ह्यासाठीच आपण सदैव प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. आणि असे झाले तरच कोणतीही परंपरा पेलून धरण्याची आणि आहे तशी संक्रमित ठेवण्याची आपली पात्रता सिद्ध होईल. म्हणजे भविष्यात एखाद्या परंपराविरोधकाला आपण सडेतोड उत्तर देऊ शकू. हि प्रत्येक परंपरागत गोष्ट आपल्या नसानसात भिनली, अनुकरणीय झाली आणि पुढील पिढ्यात संक्रमित झाली तरच पाईक ह्या शब्दाला खरा न्याय मिळेल आणि आपली पात्रता सिद्ध होईल.

(क्रमश:) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.