Pune News : मेट्रोही आता पालिकेच्या मिळकतकराच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – शहरात मेट्रोची व्यावसायिक सेवा सुरू झाल्याने महामेट्रोच्या स्थानके तसेच कार्यालयांना आणि इतर अस्थापनांना महापालिकेकडून मिळकतकर आकारण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाची माहिती महापालिकेला सादर करावी, असे पत्र पालिकेकडून महामेट्रोला देण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोही आता पालिकेच्या मिळकतकराच्या जाळ्यात येणार आहे.

वनाज ते रामवाडी व स्वारगेट ते पिंपरी असे दोन मेट्रो मार्ग शहरातून जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनाज ते गरवारे महाविद्यालय या दरम्यानची पाच किलोमीटरची मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे, महापालिकेकडून मेट्रोने स्थानकांसाठी जे बांधकाम केले आहे. तसेच ज्या मिळकतीचा पुर्णत्वाचा दाखला घेतला आहे. त्याला व्यावसायिकदराने कर आकारणी केली जाणार आहे.

त्यामुळे मेट्रो प्रकल्प सुरू होताच महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले असून महामेट्रोकडून माहिती मागविण्यात आली आहे. पुणे शहरात मेट्रोची सुमारे 21 ते 22 स्थानके असणार असून एक इंटरचेंज स्टेशन तसेच एक कारडेपो असणार आहे. त्यामुळे जस-जशी ही बांधकामे वापरण्यास सुरूवात होईल तस-तसा कर आकारला जाणार आहे.

महापालिकेकडून केंद्र सरकारच्या मिळकतींना शासनाने निश्‍चीत केलेल्या भांडवली मूल्यावर मिळकतकर लावला जातो. तर राज्य शासनाच्या मिळकतींना चटई क्षेत्रावर मिळकतकर लावला जातो. पुणे महापालिकेच्या हद्दीतील मेट्रो स्थानक सुरू झाले आहेत. या मिळकतींकडून सेवाशुल्क आकारणी आवश्‍यक आहे, त्यामुळे मेट्रो स्थानकाचे नाव, वापरातील क्षेत्रफळ, भांडवली मूल्य यासह इतर माहिती मिळकतकर विभागाला सादर करावी असे पालिकेने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.