Moshi Fire News : मोशी येथे केमिकल कंपनीला भीषण आग

एमपीसी न्यूज – मोशी बोऱ्हाडेवाडी येथील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 7) रात्री नऊच्या सुमारास घडली. पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब घटनास्थळी पोहचले असून रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोशी बोऱ्हाडेवाडी येथील डी-मार्टच्या मागे एका केमिकल कंपनीला गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. आगीने काही वेळेतच रौद्ररूप धारण केले. आगीचे लोट उसळले आणि परिसरात धूर मोठ्या प्रमाणात पसरला.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या सर्व उपकेंद्रांचे बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. केमिकल कंपनीत कामगार होते. जखमींबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. अग्निशमन विभागाचे बंब आणि खाजगी टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

मोशी बो-हाडेवाडी येथील केमिकल ड्रमच्या गोडाऊनला त्री भीषण आग लागली. संत तुकारामनगर येथील अग्निशमन केंद्रातील 8 बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्याचे प्रयत्न केले. तासाभराच्या प्रयत्नातून आग आटोक्यात आली आहे.

बो-हाडेवाडी येथे हे केमिकलचे गोडाऊन असून गोडाऊन ऑइलच्या ड्रमने भरले आहे. रात्री गोडाऊनला आग लागली.  स्फोट झाल्याचे आवाज येत होते. परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे म्हणाले, आठवड्याभरपूर्वीही तिथे आग लागली होती. पण, ती थोडक्यात विझली होती. गोडाऊन ऑइलच्या ड्रमनी भरले असून त्या ठिकाणी 7 ते 8 गाड्या गेल्या होत्या. दीड तासापूर्वी आग लागली होती. आग आटोक्यात येत आहे.

देहूरोड येथेही आगीची घटना

देहूरोड येथे देखील गुरुवारी रात्री आगीची एक घटना घडली. प्राधिकरण अग्निशमन उपकेंद्राचा बंब देहूरोड येथील कॉलवर पाठवण्यात आला. एकाच वेळी आगीच्या दोन घटना घडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांवर ताण आला आहे.

बुधवारी मोशीतील कचरा डेपो पेटला

मोशी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी आग लागली आहे. बुधवारी (दि. 6) रात्री मोशी येथील कचरा डेपोला आग लागली. रात्रभर जवान ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. गुरुवारी सकाळच्या वेळी आग विझली. त्यानंतर कुलिंगचे काम दिवसभर चालले. आता गुरुवारी रात्री पुन्हा मोशी येथे केमिकल कंपनीला आग लागली. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग काम करावे लागत आहे. केमिकल कंपनीला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.