Moshi News : आपट्याच्या वृक्षांचे दान करून दसरा साजरा

एमपीसी न्यूज – दसरा सणाचे औचित्य साधून, भूगोल फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा चौक, संतनगर येथील पुर्णब्रम्ह हॉल येथे आपट्याची पाने तोडून एकमेकांना सोने देण्याचा आनंद लुटण्या ऐवजी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करून आपट्याची रोपे वाटून दसरा साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी अनिल जगताप, भास्कर दातीर, नंदकुमार ताकवले, एकनाथ फटांगडे, साहेबराव गावडे, उद्योजक सुभाष इचके, अशोक वाडेकर, सुदर्शन फटांगडे, गायकवाड काका, राजेंद्र ठाकूर, अभय जवळगी, मंदा मानकर, रोहिणी हांडे, पिंगळे, अपूर्वा वाळुंज, आर्या तसेच संतनगर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज, संतनगरचे सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते हनुमंत लांडगे, कर्नल तानाजी अरबूज, विकास गर्ग, अतुल नढे यांनी दसरा सणाचे व आपटा वृक्षाचे महत्त्व सांगून सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून समाजकार्य करावे, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना लायन्स क्लबचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल म्हणाले, “आपण समाजाचे काही देणं लागतो म्हणून आपणास शक्य होईल त्या प्रमाणात गरजू व वंचित लोकांसाठी मदतकार्य करा. कोरोना काळात त्यांनी क्लबच्या माध्यमातून दररोज सुमारे 15 हजार लोकांना अन्नदान केले. अशाच प्रकारचे कार्य करण्यात अग्रवाल समाज कायम अग्रणी असतो, असेही ते म्हणाले.

भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांचे भूगोल फाउंडेशनच्या माध्यमातून गड किल्ले साफसफाई आणि गड संवर्धन, प्लास्टिक मुक्ती, वृक्षारोपण आणि संवर्धन व इतर सामाजिक उपक्रमातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य गेल्या बऱ्याच वर्षापासून चालू आहे. आपण निसर्गाचे काही तरी देणे लागतो म्हणून सर्वांना पर्यावरणच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन वाळूंज यांनी केले. तसेच आपटा व कांचन वृक्षामधील फरक सांगून आपटा वृक्षाचे आयुर्वेदातील महत्त्व समजावून सांगून जागतिक तापमानात होत चालली वाढ ही चिंतेची बाब असून त्यासाठी सर्वांनी पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपान करण्याचेही आवाहन केले.

कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन लायन्स क्लबच्या डायरेक्टर शोभा फटांगडे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना देखील त्यांचीच होती. भूगोल फाउंडेशनच्या सदस्या शिला इचके, ज्योति दरांदले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिला इचके यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती दरांदले यांनी केले. लायन्स क्लबच्या डायरेक्टर व भूगोल फाउंडेशनच्या क्रियाशील सदस्या शोभा फटांगडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.