Moshi : टोल नाक्यावरील कामगारांची तक्रार केल्यावरून कारचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – टोलनाक्यावर कार चालकांकडून जबरदस्तीने पैसे घेतले जात असल्याची तक्रार व्यवस्थापकाकडे केल्याच्या रागातून टोलनाक्यावर काम करणार-या कामगारांनी कार चालकाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 12) दुपारी बाराच्या सुमारास मोशी टोलनाक्यावर घडली.

संतोष गोविंद गोलांडे (वय 46, रा. छत्रपती शिवाजी स्मारक जवळ, पिंपरी गाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार टोलनाक्यावरील कामगारांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष गोलांडे सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास नाशिक पुणे रस्त्याने पुण्याकडे येत होते. मोशी टोलनाक्यावर त्यांची कार आली असता टोलनाक्यावरील कामगारांनी त्यांच्याकडे टोलची मागणी केली. त्यावर गोलांडे यांनी ‘ही कार शहरातील असून स्थानिक वाहनांना टोल माफ असल्याचे सांगितले. यावरून कामगारांनी गोलांडे यांना दम दिला. त्यामुळे गोलांडे यांनी टोल भरला आणि याबाबत त्यांनी टोलनाक्यावरील व्यवस्थापकांकडे तक्रार केली. व्यवस्थापकांनी देखील ही बाब हसण्यावर घेतली. गोलांडे बाहेर आल्यानंतर टोलनाक्यावरील कामगारांनी गोलांडे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांना मुक्कामार लागला. यावरून त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.