Sangvi : लग्नास नकार दिल्याने प्रेयसीच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – एक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर प्रियकराने प्रेयसीकडे लग्नाची मागणी केली. यासाठी प्रेयसीने नकार दिला. यावरून चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीचा चाकूने खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वतःच्या हाताची नस देखील कापून घेतली. ही घटना सोमवारी (दि. 12) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास साई एव्हेन्यू सोसायटी, पिंपळे सौदागर येथे येथे घडली.

प्रतीक्षा प्रतापसिंग जव्हेरी (वय 26, रा. साई एव्हेन्यू सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमीर इम्तियाज मुन्शी (वय 29, रा. गारमळा कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमीर आणि फिर्यादी प्रतीक्षा हे मागील तीन वर्षांपासून मित्र आहेत. जानेवारी 2017 पासून ते दोघेही पिंपळे सौदागर येथे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. दरम्यान अमीर याने वारंवार प्रतीक्षाकडे लग्नाचा तगादा लावला. याला कंटाळून प्रतीक्षा, अमीरच्या घरातून निघून पिंपळे सौदागर येथे राहण्यासाठी गेल्या. दोघेजण वेगवेगळे राहत असताना देखील एकमेकांच्या संपर्कात होते. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रतीक्षा राहत असलेल्या घरात आला. त्याने प्रतीक्षा यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये प्रतीक्षा गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर चाकूने वार केला. त्यामुळे अमीर देखील गंभीर जखमी झाला. दोघांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.