Moshi toll naka : मोशीतील टोल वसुली तात्काळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन…

एमपीसी न्यूज : मोशीतील इंद्रायणी नदी पुलाजवळ असलेला मोशी पथकर वसुली टोलनाका काही महिन्यांपूर्वी मुदत संपल्याने बंद केला होता. (Moshi toll naka) मात्र, सदर टोलनाका पुन्हा सुरू करुन वाहनचालकांकडून वसुली सुरू केली आहे. मोशी आणि चांडोली टोलनाका येथे सुधारित पथकर लागू करण्याबाबत प्राधिकरणाने 5 जानेवारी रोजी सूचना जारी केली आहे. या टोल वसूलीचा वाहनचालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सदर टोल वसुली तात्काळ बंद करावी अन्यथा आंदोलन करू अशी मागणी चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने केली आहे.

वास्तविक, पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त आहेत. यामध्ये आता नागरिकांना आर्थिक भुर्दंडदेखील सोसावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. टोलनाक्‍यांवरील रांगांमुळे मोशीतून अवघ्या सहा सात किलोमीटर असलेल्या चाकणला किंवा चार किलोमीटरवर असलेल्या भोसरी, नाशिक फाट्याला जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो. रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यामुळे अनेक वर्षे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टोल नाका बंद झाल्याने मध्यंतरी काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, आता पुन्हा टोल वसुली सुरू झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा टोल कायमचा बंद करावा, अशी मागणी वाहन चालकांची आहे.

Moshi News : पर्यावरणाबरोबर आपल्या सुराज्यातील गडकिल्ले आणि अध्यात्माविषयी प्रेम कायम राहू द्या – हभप गुलाब महाराज खालकर

दुसरीकडे, टोलनाक्यामुळे अनेक गावांना त्याचा फटका बसणार असून नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार आहे. एकीकडे याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून याचे नियोजन करण्यात येत नाही. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे आहेत. यावर उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.(Moshi Toll Naka) रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न धुळखात पडला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलनाका बंद करावा आणि स्थानिक नागरिकांची होणारी लूट थांबावी, अशी आग्रही मागणी आहे. अन्यथा स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांना सोबत घेवून प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करेल.असा इशारा चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.