Moshi : मोशी कचरा डेपोच्या आगीवर आठ बंब, 20 टँकरच्या मदतीने नियंत्रण

एमपीसी न्यूज – मोशी येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोला बुधवारी (दि. 6) आग लागली. आग अचानक वाढली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट तयार झाले. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या आठ बंबांच्या तसेच खाजगी वीस टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे प्रमुख किरण गावडे यांनी सांगितले.
बुधवारी मोशी येथील कचरा डेपोला आग लागली. सुरुवातीला ही आग लहान होती. आगीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ उपाययोजना केल्या असत्या तर  आग पसरण्यापूर्वी नियंत्रणात आणता आली असती अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र आग वाढत गेली. कचऱ्याने पेट घेतला. यामुळे धुराचे लोट परिसरात तयार झाले. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आठ बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यास अडचणी येऊ लागल्याने खासगी २० टॅंकरची मदत घेण्यात आली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
गुरुवारी सकाळी आग आटोक्यात आली आहे. त्यानंतर आगीचा ठीकाणी कुलींगचे काम सुरू असल्याचे अग्निशमन विभाग प्रमुख किरण गावडे म्हणाले. आगीचे नेमके कारण समजले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.