Thergaon News: पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा आंदोलन – विश्वजीत बारणे

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून थेरगावातील गणेशनगर, गुजरनगर, वाकडरोड, पद्मजी पेपर मिल, दत्तनगर या भागात अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. कमी दाबाने होणा-या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे तातडीने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनाप्रमुख विश्वजीत बारणे यांनी दिला आहे.

याबाबत विश्वजीत बारणे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याशी पाण्यापुरवठ्याच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. विश्वजीत बारणे म्हणाले,   मागील काही दिवसांपासून थेरगावातील गणेशनगर, गुजरनगर, वाकडरोड, पद्मजी पेपर मिल, दत्तनगर या भागात मोठ्या प्रमाणावर अपुरा, अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या समस्येने नागरिक त्रस्त असून अनेक तक्रारी आल्या आहेत.

यासंदर्भात ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या. परंतु, आजतागायत या समस्येवरती कोणताही तोढगा काढण्यात आला नाही. प्रत्येक वेळी काहीतरी कारणे सांगून वेळ मारुन नेली जाते. पण, पाण्याची समस्या सुटत नाही. अनियमित होणा-या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा त्वरीत सुरळीत करावा. अन्यथा युवा सेना नागरिकांसह तीव्र आंदोलन करेल, असा इशारा बारणे यांनी निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.