Vadgaon Maval : साखर कारखान्याच्या टायर बैलगाडीला ‘ब्रेक’; महिंद्रा कंपनीचे कामगार संदीप पानसरे यांचे संशोधन

एमपीसी न्यूज – साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या टायर बैलगाड्यांना तीव्र उतारावरून सहज वाहतुकीसाठी ब्रेकची सोय झाली आहे. हे संशोधन महिंद्रा कंपनीचे गुणवंत कामगार संदिप पानसरे यांनी केले आहे. बैलगाड्यांना ब्रेक लावल्याने उतारावरून होणारी अवजड वाहतूक सुखकर आणि सुरक्षित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यातील साखर कारखाने सरासरी दहा किलोमीटर परिसरातून ऊस वाहतूक करण्यासाठी टायर बैलगाडीचा वापर करतात. कारखान्यांच्या परिसरातील तीव्र चढ उतार असलेल्या ठिकाणावरून गाडीवान त्याचे कुटुंब व बैल जोडी दररोज जीव धोक्यात घालून ऊस वाहतूक करत असतात.

महिंद्रा कंपनीचे संदिप पानसरे यांनी ही धोकादायक परिस्थिती पाहिल्यावर यातून सुरक्षित राहण्यासाठी काही मार्ग काढता येईल का, यावर विचार करून धोका टाळण्यासाठी टायर बैलगाडीला ब्रेक लावल्यास धोका टळू शकतो. असे निश्चित करून त्यांनी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी राजेंद्र वणवे यांच्याकडे ही संकल्पना मांडली, त्यांनी या बाबत कारखान्याचे कार्यकारी संचालकसाहेबराव पठारे यांच्याशी चर्चा केली व पठारे यांनी टायर गाडीला ब्रेक बसवण्याच्या कामास परवानगी दिली व कारखान्याच्या वर्कशॉपमध्ये रिकामी टायर बैलगाडी दिली.

पानसरे यांनी ऊस टायर बैलगाडीवर संशोधन सुरू केले,दोन्ही चाकांना हबवर ब्रेक ड्रम व लायनर लावून ब्रेक बसविला आणि त्याचा हँडल गाडीवानाला दिला, ब्रेक बसवलेल्या रिकाम्या गाडीच्या चाचण्या घेण्यात आल्या,त्या नंतर गाडीमध्ये दोन तीन टन ऊस टाकून चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे गाडीवान व त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे तसेच कारखान्याचे अधिकारी राजेंद्र वणवे व मोहन काळोखे तसेच इतर अधिकाऱ्यांसह चाचण्या घेऊन ब्रेक यशस्वी झाल्याचे सांगितले. या यशस्वी संशोधनाकरीता मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी महिंद्रा कंपनीने विनायक कडसकर,सुधाकर राणे,रवी वैद्य,विजय मोकाशी,स्वप्नील पाटील,तुषार कुळकर्णी, नितीन सोनवणे यांनी मदत व मार्गदर्शन केले. यासाठी गाडीवान विकास गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.