Pune News: महापालिकेने विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल 1 कोटी 33 लाखांचा दंड केला वसूल

एमपीसी न्यूज – कोरोना काळात पुणे महापालिकेने मे 2020 ते मार्च 2022 या 23 महिन्यात विनामास्क फिरणा-या 26 हजार 664 जणांकडून 1 कोटी 33 लाख 32 हजार रुपये दंड  वसूल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांना लेखी पत्राद्वारे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.  

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबत महापालिकेकडून जनजागृती केली जात होती. हात स्वच्छ धुणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात होते. वारंवार आवाहन करुनही नागरिकांकडून मास्क घातला जात नव्हता. त्यामुळे प्रशासनाने मे 2020 पासून मास्कविना फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली. विनामास्क फिरणा-यांकडून 500 रुपये दंड आकारला जात होता.

मार्च 2021 मध्ये सर्वाधिक कारवाई

मे 2020 महिन्यात 2 जणांवर, जुन 180, जुलै 417, ऑगस्ट 14, सप्टेंबर 3438, ऑक्टोबर 1267, नोव्हेंबर 585, डिसेंबर महिन्यात 416 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जानेवारी 2021 मध्ये 241, फेब्रुवारी 2162, मार्च 4417, एप्रिल 2662, मे 3705, जुन 1881, जुलै 1383, ऑगस्ट 1343, सप्टेंबर 777, ऑक्टोबर 327, नोव्हेंबर 133, डिसेंबर 277 जणांवर कारवाई केली. तर, जानेवारी 2022 मध्ये 815, फेब्रुवारी 156 आणि मार्च महिन्यात 66 जणांवर दंडात्मक कारवाई केली. अशी 26 हजार 664 जणांवर दंडात्मक कारवाई करुन 1 कोटी 33 लाख 32 हजार रुपये दंड वसूल केला आहे. सर्वाधिक कारवाई मार्च 2021 मध्ये 4 हजार 417 जणांवर केली आहे.

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले, ”मास्कविना फिरणा-यांवर कारवाईबाबत कोणताही कायदा झाला नव्हता. मास्कची वसुली कायदेशीर नाही. बेकायदेशीपणे मास्कची कारवाई करत वसुली केली आहे. याबाबत उच्च न्यायालयातही याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने ज्यांच्याकडून पावत्या फाडल्या आहेत. त्यांना बोलावून दंडाची रक्कम परत द्यावी”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.