MPC News Special : सत्ता संघर्षात रखडल्या पोलिसांच्या बढत्या

बढतीच्या यादीत नाव, पण बढतीविनाच व्हावं लागतंय सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 175 पोलीस निरीक्षकांची पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र) पदावर नियमित पदोन्नतीने पदस्थापना करण्यात (MPC News Special) येणार आहे. त्याबाबत महसूल विभाग आणि घटक पसंतीची ठिकाणे संबंधित पोलीस निरीक्षकांकडून मागविण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. मात्र त्यातील एक पोलीस निरीक्षक बढती मिळण्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले. राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षामुळे या बढत्या राहील्या आहेत.

हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक वसंतराव मुगळीकर, हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे, विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने, गुन्हे शाखा युनिट पाचचे रामदास जयसिंग इंगवले, तत्कालीन जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब बापूराव जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष मधुकर कल्याणकर या सहा अधिकाऱ्यांचा अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी काढलेल्या पदोन्नतीच्या यादीत समावेश आहे.

Pimpri : शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा प्रयोग होऊ देणार नाही, भूमिका म्हणजे पोलीसांच्या गौरवशाली परंपरेला गालबोट

राज्यात पोलीस उपाधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांची 264 पदे रिक्त आहेत. नियमित पदोन्नतीने होणाऱ्या अधिकाऱ्यांमधून आणि भारतीय पोलीस सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवेतून इतर पदे भरली जाणार आहेत. त्यातील कोंकण दोन या महसूल विभागात सर्वाधिक 107 पदे रिक्त आहेत. यामध्ये मुंबई शहर यासह ठाणे, नवी मुंबई, डायल 112, मीरा भायंदर, मुंबई रेल्वे, ठाणे, रायगड आणि इतर साईड ब्रांच येतात. त्यापाठोपाठ पुणे महसूल विभागात 38 पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) 6, सांगली 5, पुणे 4, पिंपरी-चिंचवड आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रत्येकी 3, पुणे ग्रामीण, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण प्रत्येकी दोन आणि इतर घटकांमध्ये प्रत्येकी एक अशी पदे रिक्त आहेत.

अपर पोलीस महासंचालकांनी काढलेल्या यादीतील अधिकाऱ्यांकडून महसूल विभाग आणि त्यातील तीन पसंतीच्या घटकांची माहिती मागविण्यात आली. संबंधित घटकांमध्ये असलेली रिक्त पदे आणि मागणी यावरून त्या अधिकाऱ्यांची पसंतीच्या ठिकाणी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड मध्ये सहायक आयुक्तांची तीन पदे रिक्त

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात आठ सहायक पोलीस आयुक्त पदे मंजूर आहेत. पिंपरी विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे यांना बढती मिळाली असल्याने ते पद रिक्त झाले आहे. त्यासह देहूरोड, विशेष शाखा, वाहतूक शाखेस सध्या सहायक आयुक्त नाहीत. देहूरोडची अतिरिक्त जबाबदारी पद्माकर घनवट, वाहतूक शाखेची अतिरिक्त जबाबदारी सतीश माने तर विशेष शाखेची अतिरिक्त जबाबदारी डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे आहे.

यादीत नाव पण बढतीविना सेवानिवृत्त

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब जाधव यांचे बढतीच्या यादीत नाव आहे. ही यादी नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर करण्यात आली आहे. मात्र राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षामुळे बढतीची फाईल मंत्रालयात अडकून पडली आहे. त्यामुळे बढतीचे आदेश मागील काही महिन्यांपासून निघालेले नाहीत. रावसाहेब जाधव हे मार्च महिन्यात सेवानिवृत्त झाले. वेळेत बढत्या झाल्या असत्या तर जाधव यांना सहायक पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त होता आला असते. मात्र राजकीय अनास्थेचे हकनाक पोलीस बळी जात आहेत.

अन्य बढत्याही रखडल्या

पोलीस निरीक्षक ते सहायक आयुक्त / पोलीस उप अधीक्षक या बढत्या यादी काढल्यानंतर रखडल्या आहेत. मात्र पोलीस उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षक, सहायक निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या बढत्याबाबत तर यादीही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांना राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याने बढती पासून बराच काळ लांब (MPC News Special) राहावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.