Mulshi : ग्रामीण भागातील महिलांशी ‘यशस्वी’ संस्थेचा संवाद

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिन सप्ताह (Mulshi) निमित्ताने यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मु.पो. वाळेण येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सहकार्याने ‘महिला विकासाच्या नव्या वाटा – संवाद ग्रामीण भागातील महिलांशी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने शहरी भागात अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, मात्र तुलनेने ग्रामीण भागातील महिलांसाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन होताना दिसत नाही, अशा ग्रामीण भागातील महिलांसाठी एखादा उपक्रम आयोजित व्हायला हवा,असे ‘यशस्वी’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अभिषेक कुलकर्णी यांनी सुचविल्यानुसार पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मु. पो. वाळेण येथे संवाद ग्रामीण भागातील महिलांशी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मु.पो.वाळेण गावाचे सरपंच संजय साठे, गायनाचार्य मुळशीरत्न ह.भ.प. सोमनाथ महाराज साठे व माजी उपसरपंच संतोष साठे यांच्या प्रमुख सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील ग्रामदैवत वाघजाई मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार व साहित्यिक स्वाती महाळंक यांनी गावातील महिलांशी प्रकट संवाद साधला.

या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी महिला, बचत गटातील महिला सदस्य व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बाईपणाच्या दुःखाची जातकुळी बदलते, मात्र दुःख बदलत नाही, नव्या सोयी सुविधांमुळे महिलांचे जगणे थोडे (Mulshi) फार सुखकर झाले असेल, मात्र आजही बाईला अनेक कामांसाठी गृहीत धरले जाते. त्यामुळे मी घरीच असते, मी गृहिणी आहे असे दबक्या आवाजात सांगण्यापेक्षा ‘मी घर संभाळते’असे आपल्याला अभिमानाने सांगता यायला हवे, असे मत स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.

घर संसारात कोंड्याचा मांडा करणाऱ्या महिलांसाठी बदलत्या काळानुसार बचत गटाची महिलांसाठी सुरु झालेली चळवळ वाळेण गावात देखील पोहोचली आहे, या गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून १४ शौचालये उभारली आणि १४ पिठाच्या गिरण्या खरेदी केल्या ही निश्चितच प्रेरणादायी बाब आहे असे स्वाती महाळंक यांनी सांगितले. कायम दुसऱ्यांसाठी जगणारी बाई बचत गटाच्या चळवळीमुळे थोडी फार का होईना आता स्वतःपुरती जगायला लागली हे या चळवळीचे यश आहे.मी पण चार पैसे अधिक कमवु शकते किंबहुना चार जणांचे पोट मी एकटी भरू शकते हा आत्मविश्वास महिलांना मिळाला, असे सांगत स्वाती महाळंक यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या यशोगाथांची उदाहरणे सांगितली.

Pune : डॉ.केशव गिंडे यांचे नवे संशोधन; ‘स्केल चेंजर पांचजन्य वेणू’

महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक महिलेने आपापल्या जाणीवा अधिक समृद्ध करीत आपले रोजचे जगणे अधिक सुकर होण्यासाठी मी काय करू शकते असा विचार करून कृतिशील व्हायला हवे, विचारांची दिशा बदलत विकासाची नवी दिशा महिलांनी शोधायला हवी असे मत स्वाती महाळंक यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून सांगितले.

विशेष बाब म्हणजे या मनोगतानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात गावातील महिलांनी स्वतःहून पुढे येत व्याख्यात्या स्वाती महाळंक यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी वाळेण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने पंधरा हजार रुपयांचा धनादेश आर्थिक मदत म्हणून देण्यात आला.’यशस्वी’ संस्थेच्या मीडिया मॅनेजर अलिशा भावसार यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांना सुपूर्द करण्यात आला.

‘यशस्वी’ संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करीत वाळेण गावाचे सरपंच संजय साठे यांनी आभार व्यक्त केले. तर गायनाचार्य ह.भ.प. सोमनाथ महाराज साठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वाळेण गावाची सांस्कृतिक परंपंरा, बगाड यात्रा, वीरगळ संवर्धन मोहीम आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर गोफण व ऋषिकेश शिंदे, मयुरी तिळकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.