Mumbai : चक्क १६ कलाकारांनी घरात स्वत:च केलं फोनवर मालिकेचं चित्रीकरण

Mumbai: About 16 artists shot the series on their phones at home

एमपीसी न्यूज – ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’असं नाव असणाऱ्या या मालिकेचं कलाकारांनी चक्क आपापल्या घरातच शूटिंग केलं आहे . हा मराठी मालिका विश्वातील हा पहिलाच असा प्रयोग आहे. यात नामवंत अशा १६ कलाकारांनी अभिनयासह स्वत:च चित्रीकरण, तर दिग्दर्शकाने घरुनच दिग्दर्शन केलं आहे. ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवरुन दाखवण्यात येणार आहे.

सध्या सगळेच मनोरंजन विश्व ठप्प झाले आहे. कुठेही शूटिंग नाही की काहीही काम नाही. पण यावर या कलाकारांनी तोडगा काढला. एक भन्नाट आयडिया लढवली.  प्रत्येकाने आपापल्या घरीच मालिकेचं चित्रीकरण केलंय. चित्रीकरण कसं करायचं याबाबत दिग्दर्शकाने फोनवरून कलाकारांना सूचना दिल्या. करोनामुळे आणखी किती दिवस काम बंद ठेवणार या विचाराने लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, स्वप्नील मूरकर, मारुती देसाई व इतर कलाकारांनी हा पर्याय शोधला.

मराठी मालिका विश्वातील हा पहिलाच असा प्रयोग आहे. या मालिकेत विशाखा सुभेदार, नम्रता आवटे, मंगेश कदम, आनंद इंगळे, समीर चौघुले, लीना भागवत यांच्यासह इतर कलाकारसुद्धा झळकणार आहेत. विशेष म्हणजे सातासमुद्रापार परदेशी असलेली सुव्रत जोशी व सखी गोखले ही जोडीसुद्धा यात दिसणार आहे.

या कल्पनेविषयी श्रीरंग गोडबोले म्हणाले, ” लॉकडाउनमध्ये छोट्या पडद्यावर सर्व जुन्याच मालिका सुरू आहेत. मग कल्पना सुचली की घरूनच मालिका करावी आणि कथानकसुद्धा तसंच लिहावं. कलाकारांना सर्व कामं करावी लागली. भजी तळण्याचा सीन असेल तर त्यांनीच भजी तळली. हे सर्व करताना कुठलाही आवाज येणार नाही हेही बघायचं होतं. सगळ्यांचे फोन वेगवेगळे होते. त्यामुळे एडिटिंग ते फुटेज एका पातळीवर आणणं, असं आव्हान सर्वांनी मिळून पेललं.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.