Mumbai: श्रमिक रेल्वेगाड्यांच्या उपलब्धतेवरून भाजप- शिवसेनेत जुंपली

Mumbai: BJP-Shiv Sena allegations over the availability of Shramik Special trains

एमपीसी न्यूज – परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी करूनही केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन उपलब्ध होत नाहीत, असा तक्रारीचा सूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढताच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांची यादी द्या, असे ट्वीट गोयल यांनी केले आहे. तर ‘गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये!’, असा शेरा मारत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांच्या ट्वीटला उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) राज्यातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांची यादी द्या, असे पियुष गोयल यांनी ट्वीट करून म्हटले, एवढंच नाही तर त्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने गोयल यांनी ठाकरे यांना आठवण करून देणारी ट्वीटची मालिकाच लावली.

उद्धवजी आशा आहे तुम्ही ठीक असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. महाराष्ट्रातील मजुरांची यादी तुमच्याकडे असल्याचं तुम्ही सांगितलं. तुम्ही ती यादी कृपया रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका तासाच्या आत सादर करावी. यासोबतच ट्रेन कुठून सोडायची आहे, प्रवाशांनुसार ट्रेनची संख्या, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व माहितीही द्यावी. यानुसार ट्रेन सोडण्याचे नियोजन आम्हाला करता येईल, असं पियुष गोयल म्हणाले. आशा आहे, ट्रेन स्टेशनवर आल्यावर आधीसारख्या रिकाम्या जाणार नाहीत. तुम्हाला जितक्या ट्रेन हव्या आहेत तेवढ्या उपलब्ध करून दिल्या जातील, असं गोयल यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आतापर्यंत 7 ते 8 लाख मजूरांना घरी पाठवलं, यासाठी कुठलं पॅकेज द्यायचं? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही. राज्यभरात गोरगरीब, मजूरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत. मात्र केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन उपलब्ध होत नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

तापर्यंत जवळपास 7 लाख 38 हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठवण्यात आले आहे. यासाठी 527 विशेष श्रमिक ट्रेन महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आतापर्यंत कामगारांच्या तिकिटांसाठी 85 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आले आहे. या सर्व परप्रांतीय मजुरांना त्यांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी राज्य शासनाच्या बसेसची सुद्धा व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था राज्य सरकार करत असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

देवेंद्र फडणवीसही धावले गोयल यांच्या मदतीला

केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन मिळत नसल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जेवढ्या ट्रेन्स मागितल्या, त्या सर्व दिल्या. अगदी रात्री उशीरा ही लिस्ट आली तरी मजुरांना ट्रेन्स उपलब्ध करून दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी आज संवाद साधला. त्यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या राजकारणावरही त्यांनी टीका केली. राज्यातील परिस्थिती राजकारण करण्याची नाही. त्यामुळे माझ्याकडूनही राजकारण होणार नाही, पण नेत्यांनी राजकारण करू नये, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावर सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे, असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी दिलं.

सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे. जनतेच्या वेदनांची परिसीमा होते, तेव्हा विरोधी पक्ष हाच त्यांचा आवाज असतो आणि त्या वेदना दूर होत नाहीत, तोवर संघर्ष करणे, हेच आमचे संस्कार आहेत. आमचा संघर्ष आणि आवाज असाच सुरू राहील, कानावरचे राजकीय पडदे काढायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

रेल्वेमंत्र्यांच्या ट्विटला संजय राऊत यांचे उत्तर

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी रेल्वे पाठवण्यावरुन आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत आक्रमक पवित्रा घेतला. यावर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वे सोडण्यावरुन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्य सरकारमध्ये ट्विटरवार सुरू झालं आहे. याची सुरुवात आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या ट्विटने झाली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिलंय. त्यावर संजय राऊत यांनी देखील रेल्वेमंत्र्यांना ट्विट करत टोला लगावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.