Mumbai : जगभरातच सोन्याची मागणी ३६ टक्क्यांनी घटली

एमपीसी न्यूज : दरामधील अस्थिरता, अनिश्चित आर्थिक स्थिती याकारणाने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या काळात जगभरात सोन्याची मागणी ३६ टक्क्यांनी घटली. भारतातही ही मागणी २० टक्क्यांनी घटली असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सोनं आणि सोन्याचे दागिने याच्या मागणीतील ही घट पाहाता या वर्षखेरीपर्यंत सोन्याचा व्यवसाय आव्हानात्मकच राहील. व्यवसाय सावरण्यासाठी वितरणाची साखळी नव्याने करावी लागेल, असे अहवालात सुचविण्यात आले आहे.

गतवर्षी भारतात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या काळात सोने बाजारात ४७ हजार कोटींची उलाढाल झाली होती. ती यावर्षीच्या तीन महिन्यात ३७,५८० कोटी एवढी खाली आली आहे. भारतात सोन्याचे दर चढे राहिले (२५ टक्क्यांनी वाढले) आणि त्यातही अस्थिरता आली. भारताची अर्थव्यवस्था अनिश्चित राहिली आणि त्यातही लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प राहिली या सर्वाचा परिणाम सोन्याच्या व्यवहारांवर झाला.

२०२० सालाच्या सुरुवातीला लग्नसराईमुळे काही प्रमाणात सोन्याची खरेदी झाली. पण, नंतर मार्चमध्ये सोने बाजार एकदम अस्थिर झाला आणि या एकाच महिन्यात सोन्याच्या दागिन्यांची भारतातील मागणी ४१ टक्क्यांनी घटली अशी माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या भारतातील विभागाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.