Mumbai: शनिवारी दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच मद्यपुरवठा

Mumbai: Home delivery of liquor to 8,268 consumers in the state on Saturday

एमपीसी न्यूज – गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून शनिवारी सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. काल दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच मद्यपुरवठा करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्य सेवन परवाने ऑफलाईन पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर सेवन परवाने एका वर्षाकरिता 100 रुपये किंवा आजीवन परवान्याकरिता 1000 रुपये एवढे शुल्क अदा करून मिळवू शकतात.

राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी  करण्यात येत आहे.

राज्यात 24 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. शुक्रवारी राज्यात 119 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 63 आरोपींना अटक करण्यात आली असून  24 लाख 16 हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात 15 मेपर्यंत राज्यात एकूण 5,608  गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,520 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 565 वाहने जप्त करण्यात आली असून 15 कोटी 17 हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  18008333333 WhatsApp Number – 8422001133 हा असून  हा ई-मेल – [email protected] आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.